उपेंद्र धोंडे, सहज जलबोध अभियान, 9271000195
नुकतंच एका फळ बागायत परिसरातल्या शेतकरी बांधवास भेटलेलो, तो म्हणतोय, दादा, खड्डे खोदून दुष्काळमुक्तीचं स्वप्न मी देखील पाहिलेलं, पण लवकरच खडबडून जागे झालो, आज दिवसाला सुमारे २००० रुपये खर्च करतोय कारण माझ्या १८ एकर रानासाठी मला रोज पाच टँकर लागतात. यातल्या पाच एकरावर डाळिंबाची बाग आहे आणि मला ती काहीही करून जगवायचीय, अगदी मला सावकाराकडून कर्जही घ्यावं लागतंय, पण याला इलाज नाही आणि इतकं करूनही बाग संपली किंवा बाजारभावाने दगा दिला तर मी संपलो, मी माझ्या कुटूंबासहित संपवणार स्वतःला”.
उपेंद्रदादा एक प्रसिद्ध भूजलवैज्ञानिक आहेत आणि शेतात खात्रीनं पाणी मिळेल अशी जागा ते नक्कीच दाखवू शकतात असं कोणाकडून तरी ऐकून जेव्हा एखादा शेतकरी अगतिकतेनं कळवळून आमच्या शेतात बोअरवेलसाठी जागा दाखवा, यावर्षी पाणी मिळाले नाही तर आत्महत्या करावी लागेल असे म्हणतो; तेव्हा माझ्या अंगावर सर्रकन काटा येतो.
आणि अशावेळी खड्डेखोरीचा तमाशा दाखवित या भोळ्या शेतकरी बांधवांना दुष्काळमुक्तीचे स्वप्न दाखवणे म्हणजे भयानक पाप/पाखंडच होय. कारण हि स्वप्नं पाहण्यात वाया गेलेला कालावधी कुठलाही शाश्वत पाण्याची हमी देणारा पर्याय हाती नसलेल्या त्या असहाय्य शेतकऱ्याला मृत्यूच्या दोरीपर्यंत अधिक वेगाने नेतोय. ज्या ठिकाणी सावकारांचे व्याजाचे दर वर्षाला २४ टक्के किंवा त्याहूनही जास्त आहेत आणि पाण्याच्या बाबतीत कसलिही शाश्वतता नाही तिथं शेतकरी घेतलेलं कर्ज कसं काय फेडणार?
आणि या भीषण परिस्थितीतही स्वयंघोषित जलतज्ञांनी जी काही अनागोंदी चालवली आहे ती पाहता म्हणावं वाटते कि, केवळ अंगावर भगवी वस्त्र टाकली म्हणजे कुणी साधू होत नाही, साधुपण इतके सहज सोपे असते तर हठयोगींना कठोर तपश्चर्या करण्याची गरजच का भासली असती? ज्ञानाचा मार्ग तप-तपश्चर्येचा आहे तिथे निव्वळ अंगावर भगवी वस्त्रे परिधान करून केलेली लबाडी काय उपयोगाची?
मुळात फसवणारा पापी की फसवणूक करून घेणारा? आणि हे कळूनसुद्धा भोळे भाविक दैवी कृपेच्या आशावादाने अशा बाह्यावडंबरी साधूंपुढे डोके टेकवतातच. असे हे भाविक काय नि ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात कृतार्थता मानणारे जलयोद्धे काय, दुर्दैवाने तर्क-चिकित्सेला धरून वर्तन होतेय असे फारसे दिसत नाही.
मध्यंतरी मला एका संस्थेनं त्यांच्या एका कामासाठी तांत्रिक सल्ला घ्यावा म्हणून निमंत्रण दिले होते. गावाजवळील नदिपात्र पाहून काही सूचना करता येतील का ते बघायचं होतं. मी पोचलो असता तिथे ढोलताशा आणि आरती वगैरेची तयारी दिसली. मी या माणसांचे चेहरे पाहिले आणि तो आशावाद, आता दुष्काळमुक्ती होईलच.! मी आयोजकांना म्हटलं, हे स्पिकरवर गाणं, ही बैंडबाजा तयारी, हे सारं गरजेचं आहे का?
दुसरं उदाहरण.. एका अभिनेत्याचा संवाद पाहिला ,”भर उन्हात मी स्वतः कूदळ-फावडं घेऊन सीसीटी केली आणि अंगावरून निथळणाऱ्या घामानं मला कृतार्थ केलं, आता दुष्काळमुक्ती होणारच”. आहाहा.. काय ते वाक्य! अहो, संपूर्ण अभिनयकौशल्य पणाला लावून म्हटलेला असा हा संवाद पाहताना दर्शक भावूक होणारच, यात नवल काय?
अपंग, म्हातारी, गरीब, पिचलेली माणसं, गरोदर, लेकूरवाळ्या भगिनी उन्हातान्हात घाम गाळताना दाखवली जातात, श्रीमंत, शहरी, जिन्स-पैंटवाली माणसं हौशीपणानं हातात कुदळ-फावडं घेत कॅमेऱ्यापुढे येतात आणि मागं एकुणच पार्श्वभूमीला कधी गंभीर तर कधी उथळ उन्माद करणारा सांगितिक प्रचार, सगळं नेपथ्य कसं नियोजनपूर्वक.!
पण हे पाहून माझं मन मात्र विषन्न होतं. होय विषन्नच, कारण शूद्ध जलवैज्ञानिक तत्वांना हरताळ फासून सोप्या खड्डेखोरीस भावूकतेचा मूलामा देणं हि भयानक पाखंडताच आणि समाजातील हे पाखंड व बाह्यावडंबर पाहूनही जर कुणाच्या मनाला वेदना होत नसतील तर तुम्हीही तितकेच कृतघ्न ठरता.
दरवर्षी खड्डेखोरीचा धुमाकूळ, पुरस्कार प्रसिद्धीचा हव्यास, दुष्काळमूक्तीचा आशावाद आणि उन्हाळ्यात पुन्हा पाण्यासाठी वणवण हे दुष्टचक्र संपतच नाही. सहज जलबोध अभियान हे दुष्टचक्र भेदण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही सहज जलबोध निसर्गरक्षक जलक्षेत्रातील तांत्रिकता माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी लोकांना भावूक करून अज्ञानाच्या अंधारात लोटून देण्याऐवजी त्यांना डोळस करून, लख्ख प्रकाशात वास्तवाचे भान जागृत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू.