भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली १० कोटी रुपयांची तरतूद
नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त अरब राष्ट्रातील तीन देशांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पार पडत असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तब्बल १० कोटी रुपयांची तरतूद ठेवत २० हजार जणांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना या संकटाचा सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. अनेक स्पर्धा रद्द देखील कराव्या लागल्या आहेत. यामध्ये जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलला देखील फटका बसला आहे. त्यामुळेच आता संपूर्ण खबरदारी घेत या स्पर्धेचे संयुक्त अरब राष्ट्रांत आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ही स्पर्धा आयोजित करताना कोरोनाचा परिणाम होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू, त्यांचे सहायक आणि संबंधित यंत्रणा यांच्यासह अन्य घटकांसाठी तब्बल २० हजार चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमून तब्बल १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, स्पर्धेच्या निमित्ताने दुबईत आलेल्या खेळाडूंना पहिले सहा दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतरच त्यांना इतरत्र खेळण्यासाठी अथवा फिरण्यासाठी परवानगी दिली गेली आहे.











