बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या आरोग्य यंत्रणेने वाढत्या कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने तालुक्यातील तीन गावांमध्ये घरोघरी सर्व्हे करण्याचा व संशयित आढळताच त्याची रॅपीड अॅंटिजेन चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी हे सर्वेक्षण होणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील तीन गावांची निवड यासाठी करण्यात आली आहे. यामध्ये तीन वर्षापुढील सर्व जणांची थर्मल स्क्रिनींग व ऑक्सिजन पातळी शोधली जाणार आहे. यामध्ये जे संशयित आढळतील, त्यांची लागलीच रॅपीड अॅंटिजेन चाचणी केली जाणार आहे. त्याच गावात ही चाचणी होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी अहवाल देऊन पॉझिटिव्ह आल्यास त्यास लागलीच क्वारंटाईन केले जाणार आहे.
सोमवारी एकाच दिवसांत या तीनही गावात हा सर्वे केला जाणार आहे. ज्या माध्यमातून गावातील सामान्य लोकांमध्ये कोरोनाचा शिरकाव किती प्रमाणात झालेला आहे याची निश्चित माहिती प्रशासनास होण्यास मदत होणार आहे. याकरीता प्रत्येक गावांसाठी वेगवेगळी पथके करण्यात आली आहेत.
सातारा, उस्मानाबाद जिल्ह्यात गावनिहाय असे सर्व्हे यापूर्वी झालेले आहेत. त्यांचे परिणाम चांगले दिसून आले असून कोरोना रोखण्यासाठी त्याची मदत झाली आहे. आता बारामतीत त्याचे परिणाम दिसण्यास मदत होणार आहे.










