मालोजीराजेंच्या गढीवरील पुरातन चिंचेचे झाड नगरपालिकेने बेजबाबदारपणे जमीनदोस्त केले..! चित्रबलाक पक्षांचा झाडाखाली चिरडून मृत्यू.. जखमी पक्ष्यांवर उपचाराऐवजी परस्पर विल्हेवाट लावली.? पक्षीप्रेमींमध्ये संतापाची लाट..
इंदापूर
चित्रबलाक या परदेशी पक्षांसाठीची एक हृदय पिळवटून टाकणारी घटना काल सायंप्रहरी इंदापूर शहरात घडली. जुन्या तहसील कचेरीतील, तथा मालोजीराजेंच्या ऐतिहासिक गढीवरील मुळ्या कमकुवत झाल्याने धोकादायक बनलेले पुरातन चिंचेचे झाड योग्य पद्धतीने उपाययोजना न करता हलगर्जीपणाने नगरपालिकेने जेसीबी लावून जमीनदोस्त केले. मात्र परदेशातून विणीच्या हंगामासाठी इंदापुरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही चिंचेच्या झाडावर आश्रयाला आलेल्या शेकडो चित्रबलाक पक्षांचा झाडाखाली तडफडून मृत्यू झाला. अनेक मृत व जखमी चित्रबलाक पक्षांवर उपचार न करता नगरपालिकेने परस्पर विल्हेवाट लावत पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार प्रत्यक्षदर्शींच्या चर्चेतून पुढे येत आहे . या घटनेमुळे पक्षीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
इंदापूर शहरातील छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीवर पुरातन कालापासून काही चिंचेची झाडे आहेत. धोकादायक बनलेली झाडे काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी पुढे येत असतानाच हे ऐतिहासिक झाड काल शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जमीनदोस्त केले. मात्र या झाडावर आश्रयाला असणाऱ्या हजारो चित्रबलाक पक्षांचा व वटवाघुळांचा झाडाखाली चिरडून नाहक बळी गेला. त्यामुळे पक्षी प्रेमी आणि नागरिकांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. झाड पाडल्यानंतर संबंधित प्रशासनाने जखमी पक्षांवर उपचार करण्याची तसदी घेतली नाही, तर त्यांना गडबडीत पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी खाजगीत सांगितले.
चिंचेच्या याच झाडावर दरवर्षी परदेशातून चित्रबलाक पक्षी प्रजननासाठी (विणीच्या हंगामासाठी) इंदापूरमध्ये येतात. त्यामुळे अनेक पक्षी प्रेमी निरीक्षण करण्यासाठी तसेच पक्षी पाहण्याचा आनंद घेण्यासाठी येत असल्याने अनेक पक्षी प्रेमींचे हे आवडते ठिकाण बनले होते. सध्या अनेक पक्षांची पिल्ले झाडावरून उडून जाण्याच्या अंतिम टप्प्यात होती. मात्र नगरपरिषदेच्या एका चुकीच्या निर्णयामुळे या नवजात परदेशी पाहुण्यांचा नाहक बळी गेला. यामध्ये हजारो स्थानिक वटवाघळांचाही समावेश आहे. नियमबाह्य पद्धतीने आणि पक्ष्यांना वाचवण्याचा किंचितही प्रयत्न न केल्याने परदेशी पाहुण्यांचा नाहक जीव गेला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत. विशेष म्हणजे या संदर्भात वन विभागालाही कोणतीच कल्पना देण्यात आली नसल्याचे वन विभागाच्या एका रेस्क्यू करणाऱ्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.
घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तथा पक्षीप्रेमींनी याबाबत वन विभागाला याबाबत कळविले. त्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. ५ तासांहून अधिक काळ टीम रेस्क्यू करत होती. अजूनही अनेक पक्षी झाडाखाली अडकले असल्याचे त्यांचे म्हणणे होते. अनेक पक्षांच्या पिलांनी शेजारच्या झाडांवर आश्रय घेतला आहे. तर काही पक्षी दूरवर आकाशात त्या झाडाकडे पाहत घिरट्या घालत होते. हे चित्र पाहून शहर व तालुक्यातील पक्षी प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत.
इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी यांनी सदर जखमी पक्षांवर उपचार केले जातील एवढीच माहिती देऊन वन विभागाची टिम पाठवतो असे सांगितले. केवळ दहा-बारा पक्षी मृतावस्थेतील घेऊन, वन विभागाचा पिंजरा व एक-दोन कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेले. परंतु पुन्हा रात्री उशीरापर्यंत वन विभागाचे कोणीही या दुर्घटनेकडे फिरकले नाही.
दरम्यान या घटनेनंतर इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली. नगरपरिषदेने आपली जबाबदारी झटकण्यासाठी कचरा डेपोमध्ये पक्षी घाईगडबडीने आणून पुरल्याची चर्चा असल्यामुळे इंदापूर शहरातील नागरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कचरा डेपोत, पक्ष्यांची शोधाशोध करण्यास आले. मात्र कचरा डेपोत उग्र वास तसेच रात्री अंधार असल्यामुळे त्यांना पक्षी उकरण्यात यश आले नाही. वनविभागाच्या गलथान कारभारामुळे खऱ्या अर्थाने पक्ष्यांवर उपचार झालेले नाहीत. असाही आरोप नागरिकांचा आहे.
दरम्यान इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रा.कृष्णा ताटे यांनी नगरपालिकेच्या गलथान कारभारावर आक्रमक होऊन जहरी टीका केली. याचवेळी शेकडो पक्षी गलथान कारभाराने मृत झाल्याचे सांगत असताना ते भावनाविवश झाले. त्यांनी त्याबद्दल खूप दुःख व्यक्त केले. माणसाचा जीव काय, प्राण्याचा जीव काय? जीव हा जीवच असतो. परंतु पक्षांवर उपचार न करता त्यांना पुरले गेले आहेत अशी शंका लोकांना आहे. याची चौकशी झाली पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणीही प्रा. कृष्णा ताटे यांनी रात्री पत्रकारांकडे केली. संघर्ष समितीचे कार्यकर्ते यांनी इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये जावून चित्रबलाक पक्षांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.