दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कोरोना बाधीत गावांतील घरोघरी कोरोनाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॅा.सुरेखा पोळ यांनी दिली.
दौंड तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील सर्व कोवीड सेंटर हाऊसफुल झाले आहेत. तर अनेकांचे नमुने तपासणीसाठी कोव्हिड सेंटरवर येत आहेत. काहीजणांना घरीच उपचार करावे लागत असल्याने अनेक गावांमध्ये कुटूंबातील सर्वजण कोरोनाबाधीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वतःहून तपासणी केली जात नसल्यानेही रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या गावांमध्ये घरोघरी कोरोना तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाची नेमणुक करण्याचा निर्णय तहसीलदार हनुमंत म्हैत्रे यांनी घेतला आहे. तसे आदेशही आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे २०० अधिकारी व कर्मचारी संबंधितांची रॅपिड अॅंटीजेन तपासणी करणार आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यावर तातडीने कोव्हिड सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.
घरोघरी तपासणी केल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात मोठी मदत होणार असल्याचे डॉ. सुरेखा पोळ यांनी सांगितले. या तपासणीकामी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.










