अनेक ठिकाणी गुलाब पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचं स्वागत!
दौंड : महान्युज लाईव्ह
आज जिल्हा प्राथमिक शाळेचा पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस म्हटलं की, शाळेतील केरकचरा साफसफाई करायला लावत असल्याने पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी शाळेला दांडी मारत असल्याचे चित्र यापूर्वी पाहायला मिळायचे. मात्र सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील परिस्थिती बदलली आहे.
आता शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात येत आहे. तर दौंड शहरातील भीमनगर येथील नवयुग प्राथमिक शाळेत विद्यार्थी चक्क उंटावरूनच एन्ट्री केली. विद्यार्थ्यांनी शहरातून वाजत गाजत उंटावरून थेट शाळा गाठली. त्यावेळी शिक्षकांनी व पालकांनी या नवविद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले.
आज शाळेच्या पहिला दिवस नवयुग प्राथमिक शाळा भीमनगर दौंड या शाळेत यंदा अनोख्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाळेत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व ढोल ताशाच्या गजरात उंटावर बसवून मिरवणूक काढण्यात आली.
नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुमुख नारंग, दीपक सोनवणे तसेच स्व. ला. भा. गॅरेला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब वागस्कर, नवयुग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप मांडे, शिक्षक पंकज सोनवणे, अशोक गिरमकर ,संतोष गवळी, रूपाली निडोनी, लता चितळे, प्रगती बंगाळे आदींसह पालकही उपस्थित होते.
तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक वाड्या वस्त्यांवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.