नायक बारामतीच्या समृद्धीचे
घनश्याम केळकर / विक्रम जगताप
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या तिन्ही बाबी एकाच मापाने मोजाव्यात असे यापुर्वी मराठी बाप आपल्या मराठी पोरांना सांगत आले. अर्थातच त्याचा परिणाम म्हणून कोठेतरी ‘ एकदा चिकटला म्हणजे आयुष्याचे सार्थक झाले ‘ असे म्हणत आपल्या पोरांना कुठलीतरी नोकरी लागावी म्हणून देव पाण्यात घालून बसणारी पिढी निर्माण झाली. घोड्याच्या पाठीवर बसून आताच्या पाकिस्तानातील अटक नदीपासून कन्याकुमारीपर्यंत अख्खा देश आपल्या तलवारीच्या जोरावर ताब्यात ठेवणाऱ्य़ा मराठी माणसाचे असे कसे झाले हा खरे तर मोठा प्रश्न आहे. पण आता परिस्थिती बदलते आहे. मोठ्या प्रमाणात मराठी माणसे उद्योगात उतरत आहे, धोका पत्करत आहेत आणि यशस्वीही होत आहे. पणदऱ्यातील तरुण पोरांना ही उद्योजकतेची प्रेरणा मिळते ती सुहास जगताप यांच्याकडे पाहून. सुहास जगताप यांचा संघर्ष पाहिला की आपणही काही करू शकतो हे वेगळे सांगायला लागत नाही.
पणदऱ्यामधील एका खोलीच्या घरात त्यांचे बालपण गेले. त्यावेळची जुनी राहणी. गरीबी पाचवीलाच पुजलेली. कुणाचीही फार मोठी स्वप्ने नव्हती. पोटापुरते मिळाले तरी त्यात समाधान होते. आजोबांच्या पिढीत गरीबी होती, पण व्यसने नव्हते. पण वडिलांच्या पिढीत मात्र घरात व्यसनाने प्रवेश केला. त्यामुळे त्याचे चटके लहानपणी प्रचंड सहन करावे लागले. शाळेला जायला पैसे नव्हते. दहावीला चांगले मार्क मिळाले. अकरावी सायन्सला प्रवेश घेतला पण सायन्स प्रक्टिकलसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठीही पैसे नव्हते. अर्धवेळ कामे करून शिक्षणासाठी लागणारा पैसा जुळवावे लागे. घरातून जे काही उत्पन्न येई त्यातले बहुतेक वडिल दारूत उडवित, वेळप्रसंगी आईचे दागिनेही त्यासाठी गहाण ठेवीत. अकरावीत असताना फाटलेली पॅंट लांब शर्टखाली लपवत सुहास जगताप कॉलेजला जात होते. पण हे फार काळ चालले नाही. अखेर शिक्षण सुटलेच.
बारावीत शाळा सोडली. बारामतीत एका कंपनीत कामाला शिकावू वेल्डर म्हणून कामाला सुरुवात केली. पण अगदी ठरवून एका लोखंडी पाईप बनविणाऱ्या कंपनीत कामाला सुरुवात केली. कारण त्यांच्या घरासमोर एक वर्कशॉप होते. ते पाहून अगदी लहानपणापासून असे वर्कशॉप सुरु करण्याच्या स्वप्नाने त्यांच्या मनात घर केले होते. कंपनीत काही वर्षे काम करून अनुभव घेतल्यावर पुन्हा त्या स्वप्नाने उचल खाल्ली आणि स्वत:चे वर्कशॉप सुरु करण्यासाठी त्यानी हालचाल सुरू केली. अर्थात हातात पैसे असे नव्हतेच. त्यावेळी भाऊ संजय यांना मदतीला घेतले. सतीश काकडे यांच्या मदतीने एका पतसंस्थेतून २० हजाराचे कर्ज घेतले. पतसंस्थेने शेअर्ससाठी रु.४००० कापून घेतले आणि रु.१६००० हातात ठेवले. तेवढ्या रकमेत घराच्या मागील बाजूसच साध्या पत्र्याच्या शेडमध्ये वर्कशॉप सुरु केले. ते १९९७ साल होते. लोखंडी ग्रील, दरवाजे बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुकानांची रोलींग शटर्स बनविण्यास सुरुवात केली. पहिले काही दिवस अडचणीचे गेले, पण हळूहळू जम बसत गेला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुहास जगतापांचे श्रद्धास्थान आहेत. खरेतर अजितदादा हे राजकारणातील व्यक्तिमत्व आणि सुहास यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. पण अजितदादा यांनी एक मराठी माणुस उद्योग उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे हे पाहून वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच आज आपण या टप्प्यावर पोचल्याचे सुहास जगताप सांगतात.
सुहास जगतापांची ही कथा केवळ त्यांची एकट्याची कहाणी नाही तर पणदरे येथील एमआयडीसीमधील वेगवेगळ्या उदयोगांचीही आहे. अजित पवारांनी घेतलेल्या पुढाकाराने या एमआयडीसीतील जागा खरोखर ज्यांना उद्योग करायचा आहे अशा उद्योजकांना मिळू शकल्या. जागोजागी रिकामे प्लॉट, बंद पडलेल्या उद्योगांनी भरलेल्या एमआयडीसी दिसत असताना पणदऱ्याच्या एमआयडीसीत वेगळे चित्र दिसते आहे. इथले बहुतेक उद्योग चांगल्या स्थितीत सुरु आहेत. यातील आणखी सुखद धक्का म्हणजे येथील उद्योगात पणदरे परिसरातील उदयोजकांची मोठी संख्या आहे. स्थानिक तरुणांना रोजगार पुरवणारी तसेच त्यांनाही उद्योगाची प्रेरणा देणारी ही एमआयडीसी अजित पवारांची देन आहे.
खरेतर ही एमआयडीसी सुरु झाली ती १९८९ मध्ये. पण त्यावेळी येथे प्लॉट घेण्यास कोणी तयार नव्हते. एकतर उद्योगात पडण्याची मानसिकता नाही. त्यात एमआयडीसीतील प्लॉट नावावर होत नाही तसेच विकताही येत नाही. त्यामुळेही येथे प्लॉट घेण्याबाबत उदासिनता होती. ही परिस्थिती बदलली ती २०१४ मध्ये अजितदादांनी घेतलेल्या पुढाकाराने. त्यांनी पुढाकार घेऊन साधारण पंचवीस जणांना येथे प्लॉट दिले. त्यानंतर येथील एमआयडीसी खऱ्या अर्थांने सुरु झाली. आता पन्नासपैकी ३५ ते ४० प्लॉटवर उद्योग सुरु आहेत. सुहास जगताप एमआयडीसीत प्लॉट मिळावा म्हणून २०१२ साली पहिल्यांदा दादांकडे गेले होते. हे लक्षात ठेऊन २०१४ मध्ये त्यांनी शिफारस करून सुहास जगतापांना एमआयडीसीत जागा दिली. आज या जागेवर त्यांचा सम्राट इंजिनिअर्स हा उद्योग सुरु आहे.
अजितदादांनी सुहास जगतापांना केलेली ही एकमेव मदत नाही. जेव्हा जेव्हा मदतीची गरज लागली तेव्हा ते हक्काने अजितदादांकडे गेले आहेत आणि प्रत्येकवेळी अजितदादांनी त्यांना शक्य ती मदत केलेली आहे. खोपोली येथील येथील एका कंपनीत त्यांची २८ लाखाची रक्कम अडकली होती. ते दादांकडे गेले. दादांनी एक फोन केला तो माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या पीएला. दुसऱ्याच दिवशी संपुर्ण रक्कम कंपनीकडून खात्यावर टाकली गेली.
शिरवळच्या एका कंपनीत मोलॅसिसची मोठी मागणी आहे, अशी माहिती जगतापांना त्यांच्या एका मित्राने दिली. त्यावेळी अजितदादांनी शब्द टाकला तर काम होऊ शकते या विचाराने त्यांनी दादांकडे जायचे ठरवले होते. पण तो दिवस मकरसंक्रांतीचा होता. एक मोठी राजकीय घडामोड घडून गेली होती. नवे मंत्रीमंडळ येऊ घातले होते. त्यामध्ये अजितदादांकडे मोठी जबाबदारी असणार होती, पण त्यांना अद्याप सरकारी बंगला मिळालेला नव्हता. अशा परिस्थीत दादांकडे जावे की नाही याबाबत व्दिधा मनस्थिती होती. पण मनाचा हिय्या करून आणि दादांचा ओरडा खाण्याची तयारी ठेऊन ते मुंबईला दादांकडे गेले. पहिल्यांदा त्यांनी ‘ शिरवळचा माणुस बारामतीत काम मागायला आला तर तुम्ही देणार का. तुमच्यासाठी फोन केला तर तिथला स्थानिक आमदार नाराज होणार नाही का ‘ असे उलटे घेतले. त्यानंतर गजाननला फोन करायला सांगा, असे त्यांनी त्यांच्या तेथील पीएला सांगितले. तो विषय तिथेच संपला. त्यानंतर संबंधित गजानन पाटलांचा नंबर घेऊन जगतापांनी त्यांना फोन केले, पण तोपर्यंत त्यांच्याकडे ते पत्र आलेले नव्हते. जगतापांनी नाद सोडून दिला. काही महिन्यानंतर त्यांना बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव अरविंद जगताप यांचा फोन आला. अजित पवारांचे सचीव मुसळेसाहेब तुमचा नंबर मागत होते, मी त्यांना तुमचा नंबर दिला आहे, त्यांचा तुम्हाला फोन येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळात मुसळेसाहेबांचाही फोन आला. त्यांनी सांगितले की तुमचे पत्र माझ्याकडे आले आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे शिरवळच्या कंपनीत सांगितलेले आहे. पण तुमचा नंबर या पत्रावर नसल्याने तुम्हाला कळवता आले नाही. आता तुम्ही संबंधित कंपनीत संपर्क साधा. यानंतर जगताप त्यांच्या मित्राला घेऊन शिरवळला गेले. अर्थात तोपर्यंत संबंधित मोलॅसिसचे काम दुसऱ्या व्यक्तीला दिले गेले होते. पण संबंधित कंपनीने त्यांना इतर काही सिव्हील, लेबर आणि फ्रॅब्रिकेशनमधील कामे दिली. त्यामध्येही अजित पवारांनी शिफारस केलेला माणुस नाराज होऊन जाऊ नये ही भावना होती. अजित पवारांबाबत अनेकांची अनेक वेगवेगळी मते असतील. पण त्यांच्यावर प्रेम करणारी जी हजारो लाखो लोक आहेत, ती त्यांच्या प्रेमात का आहेत, याचे उत्तर त्यांच्या या कार्यशैलीतून मिळते.
अशाच एका कार्यक्रमावेळी दादांनी विचारले की तुम्ही उद्योगासाठी भांडवलउभारणी कशी करता. त्यावर जगताप यांनी पतसंस्थेतून कर्ज घेतल्याचे सांगितले. त्यावर पतसंस्थेचे व्याज जास्त असते, तुम्हाला मी कमी व्याजदराने पीडीसीसी बॅंकेतून कर्ज द्यायला सांगतो असे सांगितले. लगेचच तिथे असलेल्या पीडीसीसीच्या अध्यक्षांनाही त्यांनी याबाबत सूचना दिल्या. पुढे काही तांत्रिक कारणामुळे हे कर्ज जगतापांना मिळू शकले नाही, पण अजितदादांनी स्वत:हून यासाठी घेतलेल्या पुढाकाराने त्यांचे दादांवरचे प्रेम आणखी वाढले.
सुहास जगतापाने खऱ्या अर्थाने उद्योगात मोठे केले ते सहकारी साखर कारखान्यांनी. या कारखान्यांनी त्यांच्याकडे आपुलकीने पाहिले. एक मराठी माणुस धडपड करतो आहे, त्याला मदत केली पाहिजे या भावनेने पाहिले. वेळप्रसंगी सांभाळूनही घेतले. या कारखाने शेतकरी सभासदांच्या मालकीचे होते. त्यामुळे कुठे ना कुठे ओळखी निघत. एका कामातून दुसरे काम मिळत जाई. त्यामुळे जगतापांचा कामाचा व्याप या साखर कारखानदारीतच वाढत गेला. पण याला मोठा ब्रेक बसला तो २०१४ नंतर. केंद्रातील सरकार बदलले. या नव्या सरकारने साखर कारखानदारीला मदत न करण्याची भुमिका घेतली. यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली. त्यासोबत जे छोटे मोठे उद्योजक या कारखानदारीवर अवलंबून होते ते सगळेही अडचणीत आले. या सगळ्याचा मोठा फटका सुहास जगतापांच्या सम्राट इंजिनिअर्सलाही बसला.
२०१४ पूर्वी त्यांच्याकडे २५० पेक्षा जास्त कामगार काम करत होते. परंतू त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली. आज येथे ३५ कामगार काम करत आहे. ७ कोटीचा टर्नओव्हर होता तो आता दीड कोटीवर आला. साखर कारखानदारीला वेळेत मदत मिळाली नाही. त्यामुळे बॅंका कर्ज देईनात. त्यामुळे कारखाने अडचणीत आले. साखरेच्या व्यापाऱ्यांकडून पैसे उचलले ते सावकारी पद्धतीने. मग त्यांना कमी दरात साखर विकावी लागली. हे दुष्टचक्र सुरु झाले. आजही जगतापांची वेगवेगळ्या सहकारी कारखान्यात कोटी दिड कोटीची रक्कम अडकली आहेत.
मात्र उद्योग म्हणला की असे चढउतार आलेच. याला तोंड देणे, अडचणीच्या स्थितीत खर्च कमी करणे, अनुकूल काळाची वाट पहात तग धरून राहणे आणि तशा काळाची चाहूल ओळखून पुन्हा भरारी घेणे हे हाडाच्या उद्योजकाला जमले पाहिजे. सम्राट इंजिनिअर्सलाही या सगळ्यातून जावे लागले आहे. २००२ च्या दुष्काळात त्यांच्याकडे कसलेच काम नव्हते. घरातील सोने गहाण ठेवले, ते सोडवता न आल्याने मोडावे लागले. पण त्यातून पुन्हा उभारी घेतली. दुष्काळ संपला आणि परत काम येण्यास सुरुवात झाली. साखर कारखानदारीत बसलेल्या झटक्यानंतरही त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली. इतर क्षेत्रातील कंपन्यांत कामे मिळविण्यासाठी सुरुवात केली. या कंपन्यांची कामाची पद्धत समजावून घेणे. त्यांना भेटी देणे, काम देण्यासाठी विनंती करणे असे सुरु केले. पहिल्यांदा छोटी मोठी कामे घेतली. त्यानंतर जसजसा विश्वास वाढत गेला तसतशी मोठमोठी कामे मिळायला लागली. लोणंदच्या सोना अलाईजमध्ये सुरुवातीला केवळ २ कामगार घेऊन काम करायला सुरुवात केली होती, तिथे आज २०० कामगार घेऊन काम सुरु आहे. या कंपनीचा प्लॅंट उभा करण्यात त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
मात्र साखर कारखानदारीत शेतकऱ्याची मुले कामाला असतात. त्यांना आपल्याबद्दल आत्मियता असते. कॉर्पोरेट क्षेत्रात मात्र कुणी सांभाळून घेत नाही. तिथे कोणतीही दयामाया नसते. त्यामुळे तिथे आपले कामच बोलते. हे आव्हानदेखील सम्राट इंजिनिअर्सने स्विकारले आणि यशस्वी करून दाखवले.
कामाला सुरुवात केली तेव्हा ते एकटेच काम करत होते. जसजशी कामे वाढत गेली तसे तसे कामगारही वाढत गेले. भुईंज कारखान्यात फॅब्रीकेशनची कामे मिळाली त्यातून कामगार वाढत गेले. वयाच्या पंचविशीत त्यांनी काम सुरु केले. आज त्यांची प्रेरणा घेऊन पणदऱ्यातील अनेक युवक वेगवेगळ्या उद्योगात उतरले आहेत. सुहास जगतापांच्या या सगळ्या प्रवासात त्यांना अगदी व्यवसायाच्या सुरुवातीपासून त्यांचे बंधू संजय यांच्या साथीने त्यांनी वाटचाल केली. खांद्याला खांदा लावून दोघांनी उद्योग सुरु केला आणि वाढवला. मात्र दुर्देवाने त्यांच्या या बंधूंचे कोविडमध्ये निधन झाली.
सुहास जगतापांना दोन जुळी मुले, यश आणि राज. दोघेही डिप्लोमा करून आता इंजिनिअरींग करत आहेत. सध्या माळेगाव येथे शिकत असतानाच घरच्या व्यवसायात लक्ष घालत आहेत. त्यातून शिकत असतानाच त्यांना प्रॅक्टीकल अनुभवही मिळत आहे. दोघेही सगळी मशीन चालवतात. हायड्रा चालवतात, बिलींग करतात. त्यामुळे आता पुढील काळात हा उद्योग आणखी भरभराटीला येणार आहे. माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक स्वप्नील अण्णा जगताप व मारूती सुझुकी नेक्साचे मॅनेजर गणेश जगताप हे त्यांचे पुतणे आहेत.
जगताप बंधूंनी दहा बाय वीसच्या जागेत साध्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेल्या वेल्डिंगच्या व्यवसायाचे रूपांतर आज सुसज्ज कंपनीत झाले आहे. यासाठी सुहास जगताप आणि त्यांच्या बंधूंनी माेठे कष्ट उपसले आणि इंडस्ट्रियल फॅब्रिकेशनच्या क्षेत्रात स्वतःचे छाेटेखानी साम्राज्य उभे केले आहे. सम्राट इंजिनिअर्स ही आज एक आयएसओ मानांकित कंपनी बनली आहे. एकेकाळी सायकल घेण्याचीही ऐपत नसलेल्या सुहास जगतापांनी जेवढ्या लक्झरी गाड्या वापरल्या तेवढ्या परिसरातील कुणीही वापरल्या नसतील. पण अजूनही त्यांना फक्त एका गाडीचा नंबर लक्षात आहे एम जे जी २८६६. ही त्यांनी घेतलेली पहिली सेंकडहॅन्ड हिरोहोंडा. ही त्यांची आजही सगळ्यात आवडती गाडी आहे.
या लेखावरील आपल्या प्रतिक्रीया सुहास जगताप यांना या ९०२८९९९९९९ मोबाईल क्रमांकावर जरूर कळवा.