राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : पावलों पंढरी वैकुंठभुवन । धन्य आज दिन सोनियाचा।।धृ.।। पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंखभेरी ।। २ ।। पावलों पंढरी क्षेम आळिंगनीं । संत या सज्जनीं निवविलों ॥ ३ ॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा ॥। सखा मायबाप ।। ४ ।। या प्रमाणे देहू येथून पंढरीच्या दिशेने लाखो माऊलींच्या सोबत निघालेला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यवत येथील मुक्काम आटपून तब्बल तेरा किलोमीटर अंतर पार करून शुक्रवारी (दि १६) सायंकाळी सहा वाजता दौंड तालुक्यातील वरवंड मुक्कामी विसावला.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या दौंड तालुक्यात गुरुवारी आगमन झाले होते. तालुक्यातील यवत येथे या पालखी सोहळ्याचा मुक्काम आटोपून हा सोहळा पुढील मुक्कामाच्या दिशेने आज सकाळी मार्गस्थ झाला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अर्थात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरुन हा सोहळा भांडगाव येथे आल्यावर या पालखी सोहळ्याची आरती घेऊन विसावा घेतला.
यानंतर पालखी सोहळ्याचे सायंकाळी चार वाजता बोरीपार्धी- चौफुला येथे आगमन होताच तुकोबा महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी केडगाव, केडगाव स्टेशन, पारगाव ,नानगाव , बोरीपार्धी, पडवी, देऊळगाव वाडा, बारामती तालुक्यातील सुपे, मोरगाव व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लाखो भाविकांचा हा भव्य दिव्य पालखी सोहळा वरवंड मुक्कामी येताच फटाक्याच्या आतिषबाजीच जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सेवाभावी संस्थांनी व ग्रामस्थांनी पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. मुख्य चौकात स्वागत कमानी उभारलेल्या होत्या. पालखी सोबत आलेल्या माऊलींची कोणती गैरसोय होऊ नये याची काळजी ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थांनी, राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी घेतली होती.
पालखी मार्गावर वारकरी भक्तांची चहा, पाणी, नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाचे आरोग्य सेवा ही तत्पर होती. वरवंड पालखी मुक्काम स्थळ व परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला होता. उद्या हा पालखी सोहळा पाटसमार्गे बारामती तालुक्यातील उंडवडी येथे मुक्कामी निघणार आहे.