उद्घाटनाची शासनास व पोलिसांनाही चक्क खबर नाही..! श्रेय घेण्यासाठी बेकायदेशीरपणे उद्घाटन करणे खासदार सुळे यांना शोभत नाही..! ॲड. जामदार
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये नीरा नरसिंहपूर पोलीस स्टेशनची इमारत मंजूर केलेली असताना त्या इमारतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. 5 जून) उद्घाटन केले. मात्र सुळे यांनी अचानकपणे केलेले हे उद्घाटन इंदापूर भाजपला रुचले नाही.
शासनास व पोलीस खात्याला माहिती नसतानाही पोलीस स्टेशनच्या करण्यात आलेल्या उद्घाटनामुळे तालुका भाजपने याचा निषेध केला. ही घटना अतिशय निषेधार्थ आहे. कोणताही अधिकार नसताना खा. सुळे यांनी पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटन केले असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.
इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी खा.
सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेले पोलीस स्टेशनचे उद्घाटन बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. ॲड.जामदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, श्री. क्षेत्र नीरा नरसिंहपूर हे भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असल्याने त्यांनी विशेष बाब म्हणून निरा नरसिंहपूर येथे पोलीस स्टेशन मंजूर केले.
त्यासाठी लागणाऱ्या इमारत बांधकामासाठी 1 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यासाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही पाठपुरावा केला. सध्या देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटनाचे अधिकार फक्त राज्य शासनाला व गृह खात्यास आहेत. असे असताना सर्व प्रोटोकॉल व नियम धाब्यावर बसवून खा. सुप्रिया सुळे यांनी बेकायदेशीरपणे केलेले इमारतीचे उद्घाटन कायदा मोडणारे आहे.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. खासदार सुळे यांच्यासारख्या सुसंस्कृत खासदाराला श्रेय घेण्यासाठी बेकायदेशीरपणे उद्घाटन करणे शोभत नाही. सुळे यांना पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनाचा अजिबात अधिकार नाही अथवा त्यांचा संबंधच येत नाही.
या उद्घाटनाची माहिती शासनास अथवा इंदापूरच्या पोलीसांनाही नव्हती, गुपचूपपणे कोनशीला लावून हे उद्घाटन उरकण्यात आले आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांनी बेकायदेशीरपणे केलेल्या उद्घाटनाचा भाजपच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असेही ॲड. शरद जामदार यांनी सांगितले.