दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
केंजळ (ता.वाई) येथील राहुल सुरेश जगताप (वय २६ वर्ष ) याने भट नावाच्या शिवारातील गुरांच्या गोठ्याशेजारी लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
राहुल हा प्रगतीशील शेतकरी व आदर्श कुटुंब व्यवस्थेमधील एक सदस्य होता. तो मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने गावात व परिसरात त्याचा मित्र परिवार मोठा होता. मात्र त्याच्या अचानक मृत्यूची माहिती गावासह मित्रांना समजताच सर्वांना धक्का बसला. राहुलचे नुकतेच लग्न ठरले होते. हे लग्न सोमवारी होणार होते. त्यामुळे घरात मंगलमय वातावरण व लगीनघाईची धावपळ सुरू होती.
शुक्रवार दि.९ रोजी घरात राहुलच्या लग्नाची मुहूर्तमेढ उभारण्यात आली, तर आज शनिवारी घाण्याचा शुभ कार्यक्रम असल्याने घरातील महिला मंडळाने शुक्रवारी घरोघरी जाऊन महिलांना हळदी कुंकू लावून घाण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मात्र शुक्रवारी रात्री जेवण करुन गोठ्यावर झोपायला गेलेला राहूल परतला नाही.
लगीन घाई असलेल्या घरात राहुलच्या मृत्यूमुळे एका क्षणात शोककाळा पसरली. राहुल ने हा निर्णय का घेतला याची माहिती अद्याप मिळालेली नसून पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.