जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व आमदार
अंबाबाईच्या मंदिराजवळ बाबूजमाल नावाचा दर्गाह आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील किती जणांना माहिती आहे कि, या दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरच गणपती बसवलेला आहे. असे हे आगळे-वेगळे कोल्हापूर. कोणीतरी एक व्यक्ती स्टेटस लावतो आणि आपण सगळ्यांनाच बडवायला सुरु करतो. स्टेटस लावणारा देखील वेडा आणि त्याला मारणारे देखील वेडे. पण, समाज कधी शहाणा होणार ?
छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणजे कोल्हापूर. अंबाबाईची नगरी म्हणजे कोल्हापूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात सर्वात जास्त ज्यांचे विचार आले ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ज्या कोल्हापूरच्या नगरीत भारतातील सर्वात जास्त शाळा बांधल्या गेल्या. विविध जाती धर्माच्या लोकांसाठी हॉस्टेल्स बांधले गेले.
ती पहिली भूमी होती जिथे बहुजनांना पुजा करण्याचे अधिकार देण्यात आले. त्याच्यासाठी वैदिक विद्यालय उघडण्यात आलं. भारतात त्याकाळी सर्वात पुरोगामी राज्य म्हणून हे ओळखलं जायचं. 1920 च्या माणगाव परिषदेत म्हणाले कि, मागसवर्गीयांना त्यांचा नेता मिळाला. बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे होते.
त्या कोल्हापूरात आता जे काही झालं ते अत्यंत दु:खदायक आहे. आपण संख्येने अधिक आहोत म्हणून अल्पसंख्यांकांना कधीही मारु शकतो हा विचार अंगावर शहारे आणतो. कोणीही बोलायचे नाही अस म्हटलं, तर मग ज्या तत्वांवर आपण जगतो आहोत त्या तत्वांशी गद्दारी करीत आहोत असे होते.
दरवेळेस मतांचे राजकारण, दरवेळेस जातीचे राजकारण, दरवेळेच धर्माचे राजकारण करतांना माझा धर्म, माझी जात याच्या पलीकडे बघायचचं नाही असं जर ठरवलं. तर मला वाटते कि, ज्या विचारांवर महाराष्ट्र उभा आहे; त्या विचारांचाच पराभव आहे.
प्रत्येक राजकारण्यांनी जर ठरवलं, महाराष्ट्रात कुठेच कोल्हापूरसारखी परिस्थिती होऊ द्यायची नाही तर ते अशक्यही नाही. पण, केवळ मतांचे राजकारण करीत सत्तेत कोण जात आहे ? आणि सत्तेत कसे जाणार ? यावर जर आपण विचार करीत बसलो, तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसे या महाराष्ट्रात होईल आणि जसे जंगलातील प्राणी पळतात तशी माणसे पळताना दिसतील.
आपल्याला काय हवं. हे त्या जनतेने आणि नेत्यांनी ठरवावं. पण, पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा ह्याला जर आपण चिकटून राहिलो आणि कुठल्याही परिस्थितीत समोर शंभर जण आहेत आणि बाजूला एक जण आहे, आणि त्या एकावर अन्याय, अत्याचार होतोय; तर त्या एकाच्या बाजूने उभे राहीलो तरी भिती वाटता कामा नये इतका धीटपणा या मातीने आपल्याला शिकवला आहे. तो आता उघडपणाने दाखवावा लागेल.
अन्यथा वैचारीक गदारोळात हा महाराष्ट्र बेचिराख होईल. निवडणूका कोण जिंकेल ? सत्तेत कोण येईल ? याची मला तरी काही काळजी नाही. मला महाराष्ट्राची नक्कीच काळजी आहे. त्यामुळे जे काही वातावरण महाराष्ट्रात सध्या आहे ते काही बरे नाही. झालेल्या घटनेबद्दल मनापासून दु:ख होत आहे.
अंबाबाईच्या मंदिराजवळ बाबूजमाल नावाचा दर्गाह आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील किती जणांना माहिती आहे कि, या दर्ग्याच्या प्रवेश द्वारावरच गणपती बसवलेला आहे. असे हे आगळे-वेगळे कोल्हापूर. कोणीतरी एक व्यक्ती स्टेटस लावतो आणि आपण सगळ्यांनाच बडवायला सुरु करतो. स्टेटस लावणारा देखिल वेडा आणि त्याला मारणारे देखिल वेडे. पण, समाज कधी शहाणा होणार ?