सांगली : महान्यूज लाईव्ह
भर दिवसा गोळीबार करत पंधरा कोटींची लूट ज्या रिलायन्स ज्वेलर्स या शोरूममधून करण्यात आली, त्याच्या तपासातील महत्त्वाचे धागेदोरे सांगली पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्थानिक गुन्हेगारांनीच टीप दिल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. दरम्यान या शोरूमवर दरोडा घालणारी टोळी परराज्यातील असल्याची देखील माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
पर राज्यातील या टोळीच्या शोधासाठी सांगली पोलिसांची तब्बल सहा पथके बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात रवाना झाली आहेत. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास आठ जणांच्या टोळीने सांगली मिरज रस्त्यावरील रिलायन्स ज्वेल्स या शोरूम वर धाडसी दरोडा टाकला. यावेळी गोळीबाराची देखील घटना घडली. दुकानातील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून या आठ जणांच्या टोळीने रिव्हॉल्वर चा धाक दाखवत 15 कोटींची लूट केली.
दरोडा टाकल्यानंतर या टोळीतील सहा जण कारमधून तर दोघेजण दुचाकीवरून फरार झाले. दुचाकीवरून जे दरोडेखोर गेले ते स्थानिक असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. दरम्यान जे कारमधून पळून गेले, त्यांनी मिरज तालुक्यातील भोसे येथील एका शेतात ही कार सोडली आणि तिथून ते पळून गेले आहेत. विशेष म्हणजे दुचाकी आणि कार या दोन्हींचा क्रमांक बनावट असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान या दरोड्याच्या तपासासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगलीमध्ये दोन दिवस थांबून होते तर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, संजय मोरे यांची पथके देखील तांत्रिक तपासाचा आधार घेऊन तपास करत आहेत.