इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या क्रियाशील आणि अक्रियाशील मतदारांचा मुद्दा थेट राज्य शासनाच्या दरबारात पोहोचल्यानंतर आता कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याला एक पत्र देऊन व्याजासहित एफआरपी आणि मुदत संपलेली रूपांतरित ठेव मागितली आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 23 च्या गळीत हंगामात दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटलेला असून गाळप हंगाम संपल्यानंतर अजूनही संपूर्ण एफ आर पी दिलेली नाही. ही संपूर्ण एफ आर पी व्याजासह देण्याचा नियम असल्याने आता एफ आर पी देताना व्याजासहित द्यावी व मुदत संपलेली रूपांतरित ठेव सभासदांना विलाविलंब मिळावी अशी मागणी जाचक यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती सहकार आयुक्त, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालकांसह राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला दिलेल्या आहेत. छत्रपती कारखान्याची निवडणूक जाहीर झालेल्या असून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे अशा स्थितीत आता छत्रपती कारखान्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होण्याची चिन्हे आहेत.