दौंड : महान्यूज लाईव्ह
पाटस दौंड अष्टविनायक रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पायी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या पती-पत्नीला धडक देऊन अपघात केला. या अपघातात पाटस येथील युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्गेश अंकुश जगताप (वय ३५, रा.पाटस – बिरोबावाडी,ता.दौंड जिल्हा पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मंगळवारी ( दि. ६) पहाटे साडे पाच वाजण्याच्या आसपास पाटस – दौंड अष्टविनायक रस्त्यावर बिरोबावाडीच्या हद्दीत असलेल्या हॉटेल अतिथी च्या समोर ही अपघाताची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दुर्गेश अंकुश जगताप व त्याची पत्नी स्वाती हे पहाटे पाटस – दौंड रस्त्यावर दौंड बाजूकडून पाटस दिशेला पायी व्यायाम करीत असताना दौंड बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुर्गेश जगताप याला पाठीमागून जोरदार धडक देऊन अपघात केला. दुर्गेश हा रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता.
नागरिकांनी व नातेवाईकांनी त्यास पाटस येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्यांनी यवत येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिल्याने त्यास जखमी अवस्थेत यवत येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातात त्यांच्या पत्नी स्वाती या थोडक्यात बचावली असून किरकोळ जखमी झाल्या आहेत. मयत दुर्गेश याचा भाऊ योगेश अंकुश जगताप यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इंदापूर व बारामती येथेही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करताना वाहनांने धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
सध्या पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता, पाटस बारामती संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व पाटस दौंड अष्टविनायक मार्ग हा रस्ता डांबरीकरण झाल्याने पक्का झाला आहे, त्यामुळे या रस्त्यावर दौंड व पाटस परिसरातील अनेक नागरिक, महिला या सकाळी सकाळी व्यायाम करीत असतात. मात्र सध्या हे रस्ते असुरक्षित झाले आहेत. हे रस्ते डांबरीकरण झाल्याने रस्त्यांवर भरधाव वेगाने वाहने ये – जा करीत असतात. त्यामुळे पहाटे रस्त्यावरून व्यायाम करणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.