पुणे : महान्यूज लाईव्ह
यावर्षी मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल किंवा सरासरी एवढा पडेल असा कितीही अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला, तरी मोसमी पावसाने पहिल्यांदाच आगमनाच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे. कारण 6 जून पूर्वीच हा मान्सून महाराष्ट्रात येईल असा जो अंदाज होता, सुरुवातीला तर तो दोन जून रोजीच मोसमी पावसाचे आगमन होईल असेही संकेत होते, परंतु प्रत्यक्षात आता दहा जून नंतरच केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल असा नव्याने अंदाज आहे.
केरळमध्येच मान्सूनचे आगमन उशिरा होत आहे. अर्थात सन 2018 नंतर पहिल्यांदाच 10 जून नंतर मोसमी पाऊस येतोय. भारतात यंदा अलनिनोची स्थिती असल्याने मोसमी पावसाचा परिणाम होईल, अशी जी सुरुवातीला भीती वाटत होती ती काही अंशी खरी ठरताना दिसत आहे. अर्थात तरी देखील हवामान खात्याने मात्र पावसाच्या प्रमाणावर काही परिणाम होणार नाही असा दिलासादायक अंदाज दिला आहे.
गेल्या पाच वर्षातील मोसमी पावसाची स्थिती पाहिल्यास पहिल्यांदाच मोसमी पाऊस लांबलेला आहे, कारण सन 2018 मध्ये मोसमी पावसाच्या आगमन केरळमध्ये 29 मे रोजी झाले होते. 2020 मध्ये तो एक जून रोजी आला होता. 2021 मध्ये तो तीन जून रोजी आला होता.
सन 2022 मध्ये तो 29 मे रोजी आला होता. यंदाही तो केरळमध्ये एक जून रोजी येईल असे सांगितले जात होते मात्र तो चार जून रोजी देखील केरळमध्ये आला नाही. असे असले तरी मान्सूनची द्रोणीय स्थिती मात्र अनुकूल आहे. दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वारे आता वाढू लागले आहे.