इंदापूरच्या नवीन मुक्कामी पालखी तळाचे काम निकृष्ट..? झालेल्या कामावर जिल्हा शिवसेना महिला आघाडीचा आक्षेप.! कामाच्या दर्जाची चौकशी करून केली कारवाईची मागणी..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या निवासी पालखी तळाची जागा यावर्षी बदलण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात हा पालखीत उभारण्यात आला असून या पालखीतळाच्या दर्जाच्या कामाबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीने आक्षेप घेतला आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार करत कामाच्या दर्जाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा कल्याणकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सीमा कल्याणकर यांनी याबाबत निवेदन बारामती लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख ॲड.गितांजली ढोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे उपनेते विजय शिवतारे यांना दिले. यावेळी तालुका अध्यक्षा रूपाली रासकर उपस्थित होत्या. इंदापूर शहरात नवीन पालखी तळ मुक्काम ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाने संत तुकाराम महाराज पालखी तळ चांगल्या प्रकारे काम व्हावे यासाठी भरघोस निधी दिला. तरीही पालखी तळाचे काम निकृष्ट दर्जाचे केले. याबाबत महिला आघाडीने काम करणाऱ्या संबंधितांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदाय पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पायी वारीत सहभागी होतो. त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवसेनेचे उपनेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सदरच्या कामाची चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी याबाबत उलट सुलट उत्तर देत असल्यामुळे या कामाबाबत शिवतारे यांनी शंका उपस्थित केली आहे.
या कामाबाबत चौकशीची उचित चौकशीचे आदेश व्हावेत, अशी मागणी ही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सीमा कल्याणकर यांनी सांगितले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन इंदापूर येथे होणार आहे. त्यामुळे नवीन पालखी तळ मुक्काम ठिकाणी झालेलं काम व त्याचा दर्जा याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.