बारामती : महान्यूज लाईव्ह
शेत जमिनीच्या वादात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून बारामती तहसील कार्यालयातील आवारात धक्कादायक घटना घडली. इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
बारामती शहर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्याला ताब्यात घेत त्याला पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले, मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली. रोहिदास माने असे या शेतकऱ्याचे नाव असून तो इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याने शेतीच्या वादासंदर्भात पोलिसांकडे दाद मागितली होती मात्र त्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. असे या शेतकऱ्याच्या निकटवर्ती यांनी सांगितले. तक्रार करुनही न्याय मिळण्यासाठी दिरंगाई केल्याने या शेतकऱ्याने थेट पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
रोहिदास माने यांनी यापूर्वी उपोषण केले होते, परंतु 11 व 12 मे 2023 रोजी रस्त्यासंदर्भात पोलीस बंदोबस्त देऊन रस्ता करू असे आश्वासन देऊन आपली दिशाभूल केली व उपोषण सोडवले आणि न्याय मात्र मिळालाच नाही.
दिलेल्या आदेशानुसार इंदापूर तहसील कार्यालयाकडून पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. त्यामुळे पाच जून रोजी आपण प्रशासकीय भावनासमोर आत्मदहन करणार आहोत असा इशारा या शेतकऱ्याने दिला होता आणि त्याने यासंदर्भात यापूर्वीच कळवले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याने थेट पेटवून घेतले.