बारामती : महान्यूज लाईव्ह
सध्या सगळीकडे लग्नाच्या अगोदर एखाद्या चित्रपटासारखी प्री वेडिंग शूटिंग चे फंडे समाजात रुजू झाले आहे. त्याच्या नावाखाली जो धांगडधिंगा सुरू आहे, त्याला आता आवर घालण्याची प्रक्रिया समाजात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा, जैन समाजातील काही संघटनांनी या संदर्भात निर्णय घेतला असतानाच, आता काल पांचाळ सोनार समाजाच्या वतीने देखील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे
पांचाळ सोनार महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष धनंजय क्षीरसागर व महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पोतदार यांनी याची माहिती दिली. महामंडळाच्या ऑनलाईन झालेल्या बैठकीत अध्यक्षांच्या सूचनेनुसार याचा ठराव करण्यात आला असून, राज्यभरातील पांचाळ सोनार समाजाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सांगलीत बैठक झाली, मात्र त्याचे पडसाद बारामती इंदापूर तालुक्यातील उमटले असून, इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पांचाळ सोनार समाजाचे रमेश कांबळे, जगदीश कांबळे, गणेश कांबळे आदींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जगदीश कांबळे म्हणाले अशा प्रकारच्या निर्णयाची गरज होती. केवळ धांगडधिंगाच नव्हे, तर या माध्यमातून चुकीच्या प्रवृत्तीला बळ मिळत असून, आपण त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे हे चुकीचे आहे.