दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या पश्चिम भागातील वरखरवाडी, मांढरेवाडी, अभेपुरी, गाढवेवाडी या गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने घरांसह शेतजमिनींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
वाईच्या पश्चिम भागातील मांढरेवाडी, अभेपुरी, गाढवेवाडी, वरखरवाडी या गावांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने ओढे नाल्यांना पूर आला. पुराच्या पाण्याने ओढ्यावरील संरक्षण भिंतीसह पुलाचे भराव आणि शेतजमीनी वाहून गेल्या, तर अनेक घरांवरील कौले आणि पत्रे वाहून गेल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि.२९ रोजी) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे ढगाळ वातावरण निर्माण होऊन वेगाने वारे वाहू लागले. काही वेळातच मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरवात झाली. मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील ओढणारे भरून वाहू लागले वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे कवले तसेच पत्र्याचे शेड उडून गेले.
जांभळीचा माळ येथील हणमंत बाबुराव भेलके या शेतकऱ्याची अंदाजे एक एकर शेत जमिनीतील माती वाहून गेल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शरद दत्तात्रय गाढवे, आनंदराव रामचंद्र गाढवे या दोन्ही शेतकऱ्यांचे पत्र्यांचे शेड उडून गेले. वामन चिकणे या शेतकऱ्याच्या घरावरील कौले उडून गेली. गाढवेवाडी गावच्या जोवंदरा ओढ्याला आलेल्या महापूरामुळे
गावच्या पुलावरून पाणी वाहत होते. काही वेळातच पाण्याच्या रेट्याने संरक्षण भिंतीसह पुलाखालील भराव वाहून गेला.