भोर : महान्यूज लाईव्ह
पुणे सातारा महामार्गावर राजगड पोलिसांनी दोन दिवसापूर्वीच एक महत्त्वाची कामगिरी बजावली, महामार्गावर तब्बल सत्तर लाख रुपयांचा गुटख्याचा ट्रक पोलिसांनी पकडला. निजामपूरच्या दोघांचे विजापूर कनेक्शन पोलिसांनी यातून उघडकीस देखील आणले, पण अवघ्या काही तासातच पोलीस चौकीसमोर लावलेला ट्रक चोरीला गेल्याचे समजते. दरम्यान खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक सापडला, पण त्यातील गुटखा मात्र लांबवला गेल्याचे समजते!
हा गुटखा पोलिसांनी देखील असा तसा पकडला नाही, तर ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ट्रक थांबवला नाही, म्हणून पाठलाग करून खेड शिवापूर नजिक तो पकडला. आता त्या पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रक नेऊन त्यातून गुटखा काढून घेण्याचे धाडस आरोपी करतात, हे भलेमोठे धाडस आहे. गुटखामाफिया किती बेडर बनले आहेत, याचा एक धडा यातून मिळाला असून या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून तपास सुरू असून, वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी दाखल झाल्याचे समजते.
या गुन्ह्यात नामदेव लवटे व चेतन खांडेकर या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील निजामपूर गावच्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मोठ्या प्रमाणातील गुटख्याची चोरी पकडली यासाठी पोलिसांचे कौतुक देखील केले जात होते, मात्र आता तो गुटखाच चोरीला गेल्याने पोलिसांचेही कसब पणाला लागले आहे. ट्रक चोरीला नेण्याचे धाडस संशयित आरोपींच्या जवळच्या कोणीतरी केले असावे असा संशय देखील व्यक्त होत आहे. या नव्या चोरीतील आरोपी व गुटखा ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अशी देखील माहिती समजते.