परभणी : महान्यूज लाईव्ह
उकिरड्यावरच्या कुत्र्याचा पांग फिटतो आपण तर माणूस आहोत.. दिवस नक्कीच बदलले असते असं सिसोदे कुटुंबातील आई-वडिलांना का वाटलं नाही? त्यांनी खूप लवकर धीर सोडला आणि या जगाचा निरोप घेतला; नाहीतर आज त्यांची तीन मुलं एकाच वेळी पोलीस भरती झाल्याचे त्यांना पाहायला मिळालं असतं..!
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी या गावातील ओंकार सिसोदे, आकार सिसोदे व कृष्णा सिसोदे या तीन भावांची राज्यातील सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीत पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे. एकाच वेळी एकाच कुटुंबातील तीन मुलांनी यश मिळवलं हे कौतुकास्पद आहेच, पण यापेक्षाही आई-वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर थोरल्या भावाने सगळं काही सोडून या तिघा भावांची आपल्या जबाबदारी आहे असं समजून जी सालगडी म्हणून जबाबदारी पार पाडली, ते या यशापेक्षाही अधिक झळाळून टाकणारं होतं.
आकाश सिसोदे हे या मोठ्या भावाचं नाव! त्यांनी गावात सालगडी म्हणून काम केलं आणि तिघाही भावांना शिकवलं. या तिघाही भावांनी त्यांच्या कष्टाचं चीज केलं. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही मोठ्या भावाने आई-वडिलांची भूमिका पार पाडून आपल्या आई-वडिलांना एका प्रकारे अभिवादन केले.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी या गावची ही कहाणी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी! आकाश, आकार, कृष्णा आणि ओंकार या चार भावंडांची ही हृदयस्पर्शी कहाणी पोलीस भरतीच्या निमित्ताने पुढे आली. आई-वडिलांनी सततच्या नापीकेला कंटाळून आत्महत्या केली.
आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे सारच काही संपलं अशा परिस्थितीत हे कुटुंब असतानाच थोरल्या आकाश सिसोदे या भावाने कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली. सालगडी म्हणून काम केले. आपल्या तिन्ही भावांना अगोदर जिल्हा परिषदेत, त्यानंतर एका आश्रम शाळेत पाठवले. नंतर आश्रमशाळाही बंद झाली. मग परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शिक्षण संस्थेने या भावंडांची अवस्था लक्षात घेत त्यांना शिक्षणाची दारे खुली केली. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर या भावंडांनी त्यानंतर वस्तीगृहामध्ये शिक्षण घेतले आणि पोलीस व्हायचं असा संकल्प करून हे तीन भाऊ धावत राहिले.
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेत या तिघा भावांनी पोलीस शिपाई पदाला गवसणी घातली आणि अख्खं गाव आनंदात न्हाऊन निघाले. खडतर आणि प्रतिकूल असे शब्दही फेके पडावेत अशी या भावंडांची कहाणी!