बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्याच्या दक्षिणेकडील काही गावात महिलांची बदनामी करणारी निनावी पत्रे पाठवली जात आहेत. हा प्रकार राजकीय खुन्नस म्हणून काढला जात आहे, की यामागे खरोखरच विकृत डोके आहे? याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.
बारामती तालुक्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील महिलांना आक्षेपार्ह शब्दप्रयोग करणारी निनावी पत्रे पाठवले जात आहेत. गेल्या काही दिवसात हा प्रकार उघडकीस आला असून घराघरात वाद लावण्याचा, कौटुंबिक वाद लावण्याचा यामागे जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे दिसते. तसेच राजकीय खुन्नस काढण्यासाठी देखील याचा वापर होत आहे का? या संदर्भातील चर्चा सध्या सुरू आहे.
महिलांचा अवमान तसेच प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी करण्याच्या हेतूने निनावी पत्राद्वारे धमकी देण्याचा प्रकार बारामती तालुक्यातील काही गावांमध्ये होत असून याबाबतीत पोलीस प्रशासनाकडून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई होईल, पण समाजामध्ये अशा विकृती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक गावातील सजग नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे