विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
यश, जिद्द, चिकाटी आणि स्वीकारलेल्या कामातील प्रामाणिकपणा या जोरावर आपण ठरविलेल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचत असतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी झालेल्या आणि शारदा पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या 86 रणरागिणी आहेत असे मत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त तथा शारदा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी व्यक्त केले…

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदा महिला मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून भरती झालेल्या मुलींचा गुणगौरव समारंभ संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार व विश्वस्त सुनंदा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुनंदा पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास डॉ. ज्ञानेश्वर पवार, प्रणित वाबळे यांच्यासह परिसरातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

यावेळी सौ पवार म्हणाल्या, मुलींनी कष्टाने मिळवलेले यश खरोखरच अतुलनीय आहे. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर सद्सदविवेकबुद्धीने निर्णय घ्या. आयुष्यात कामाशी प्रामाणिक राहा. उच्च शिक्षण पूर्ण करून पीएसआय व डीवायएसपी पदाला गवसणी घाला. पोलीस म्हणून रुजू होत आहात, स्वतःची शारीरिक व मानसिक काळजी घ्या. महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये मोलाची भूमिका तुम्हाला बजावयाची आहे.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया मध्ये शारदा प्रशिक्षण केंद्रामार्फत ग्रामीण भागातील 86 युवतींची महाराष्ट्र पोलीस दलात सातारा, नागपूर शहर, पुणे ग्रामीण, पुणे शहर, अकोला ,ठाणे ग्रामीण मीरा-भाईंदर मुंबई शहर रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे. या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल 613 मुली सध्या राज्य पोलीस दलात कार्यरत आहेत. आता भरती झालेल्या युवतींमुळे ही संख्या थेट 703 वर पोहोचली.
कोणत्याही शैक्षणिक संस्थेने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या करिअर साठी स्वतःहून केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. हे यश मिळवण्यामध्ये शारदानगर शैक्षणिक संकुलात मुलींना मैदानी परीक्षेचे मार्गदर्शन करणारे प्रशांत तनपुरे, राजेंद्र कर्णे, मनोज डोंबाळे व लेखी परीक्षेचे मार्गदर्शन करणारे प्रा. नितीन खारतोडे, कदम आर आर, संतोष लोणकर, चंद्रकांत जराड, सोनाली काटकर,प्रीती मोरे यांचे अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमासाठी संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार ,मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेच्या मानव संसाधन विभाग प्रमुख गार्गी दत्ता यांनी मार्गदर्शन केले .