राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या हातात दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती गेली आहे. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती गणेश जगदाळे तर उपसभापतीपदी शरद कोळपे यांची निवड झाली आहे.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश थोरात आणि भाजप आमदार राहुल कुल या दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्याकडे नऊ – नऊ अशा समान जागेवर उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या ताब्यात राहणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नवनिर्वाचित संचालक संपत बबनराव निंबाळकर यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीची एक जागा कमी झाली. ही कमी झालेली जागा भाजपच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे गेली २५ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांच्या ताब्यात असलेली दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात गेली आहे.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती या पदाच्या निवडणूक प्रक्रिया आज गुरुवारी (दिनांक २५) दौंड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. यावेळी सभापती पदासाठी भाजपकडून गणेश अंकुश जगदाळे तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब मारुती शिंदे तसेच उपसभापती पदासाठी भाजपकडून शरद बापू कोळपे व राष्ट्रवादीकडून वर्षा मुकेश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
या पदासाठी गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी गणेश जगदाळे यांना ९ व बाळासाहेब शिंदे यांना ८मते मिळाली. उपसभापती पदासाठी शरद कोळपे यांना ९ व वर्षा मोरे यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दौंड सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक हर्षित तावरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रकाश शितोळे यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे भाजप आमदार राहुल कुल यांनी अभिनंदन केले आहे.
दौंड तालुक्यात विकासकामांबरोबर राजकीय निवडणुकांमध्येही भाजप अग्रेसर असणार आहे. तालुक्यात चांगल्या प्रकारे विकास कामे होत असल्याने जनता भाजप सोबत आहे, हे या निवडणुक निकालाने दाखवून दिले आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना आमदार राहुल कुल यांनी दिली.