अवघ्या चार दिवसातच दौंड पोलिसांनी गुड उकलले !
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील खडकी येथे पत्नीला मारहाण करून तिचे अपहरण केले. आणि तिची निघृणपणे हत्या करून मृतदेह शेजारील गावातील उसाच्या शेतात नेऊन टाकला. या प्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी अवघ्या चार दिवसातच अपहरण केलेल्या पत्नीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. याप्रकरणी आरोपी पती संतोष अहि-या पवार ( वय २८, राहणार खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे ) याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष पवार याने त्याची पत्नी सुरेखा (वय ३५ ) हिला १९ मे रोजी मारहाण करून तिचा खून करण्याचे उद्देशाने तिला पळवून नेले होते. याबाबत २० मे रोजी सुरेखा हिची आई चंदाबाई नाहीराज भोसले (रा. कानडी ता. आष्टी जि. बीड ) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संतोष पवार याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात २० मे रोजी अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणातच तपासाची सूत्र हलवली. संशयित आरोपी संतोष पवार याला ताब्यात घेऊन अटक केले. दौंड न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता सुरुवातीला त्याने या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ केली.
मात्र पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच त्याने त्याची पत्नी सुरेखा हीचा खुन करून तिचा मृतदेह खडकी पासून काही अंतरावर असलेल्या लोणारवाडी गावचे हद्दीतील वाळुंजकर यांचे मालकीची शेतजमीन ( गट नंबर २०४/६) मध्ये असलेल्या ऊसामध्ये टाकून दिल्याची कबुली दिली.
मात्र या तपासात आरोपीने पोलिसांना वेळोवेळी गुंगारा देण्याचे काम केले. मात्र पोलिसांनी उसाच्या शेतात टाकलेल्या मृतदेहाचा शोध घेतला. हा मृतदेह नातेवाईकांनी सुरेखा हिचाच असल्याचे ओळखल्याने पोलीसाची खात्री पटली. सुरेखा हिचे अपहरण करून नंतर खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी संतोष पवार याच्यावर (कलम ३०२ व २०१) खून केल्याचा वाढीव गुन्हा दाखल केला. अवघ्या चार दिवसांच्या आत दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि त्यांच्या टीमने अपहरण च्या गुन्ह्याचे गुड उकलले. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार, पोलीस हवालदार सुभाष राऊत, पोलीस हवालदार जे.एस. मलगुंडे, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड, पोलीस हवालदार गावडे, पोलीस नाईक अमीर शेख, पोलीस नाईक शरद वारे, पोलीस नाईक शैलेश हंडाळ, पोलीस नाईक एन.एस.भागवत, पोलीस शिपाई सागर गलांडे, योगेश गोलांडे, अमोल देवकाते आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.