सचिन पवार : महान्यूज लाईव्ह
सुपे, बारामती : ही दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील बोरकरवाडी गावची आहे. शेतकऱ्याला फक्त हमीभावाचा, लहरी बाजाराचा, प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो असं नाही, त्याच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतात, त्याचा प्रत्येक वेळी काळाशी सामना असतो. बोरकरवाडीतील आकाश सुभाष बोरकर या बावीस वर्षीय युवा शेतकऱ्याचं आज असंच काहीच झालं.
आकाश बोरकर हे त्यांच्या शेतात आज सकाळी उसाची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. हा छोटा ट्रॅक्टर घेऊन उसाची बांधणी करत असताना अचानक बांधाच्या बाजूला एकेरी चाक होऊन ट्रॅक्टर पलटी झाला. त्यावेळी ट्रॅक्टर खाली आकाश सापडला. मात्र आसपास कोणीही मदतीसाठी नसल्याने त्याला ट्रॅक्टर खालून निघता आले नाही आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
दुपारी तीनच्या सुमारास शेतात मजुरीसाठी असलेल्या महिलांनी हा प्रकार पाहिला आणि त्यानंतर सगळीकडे धावपळ उडाली. मात्र तोपर्यंत संपूर्ण खेळ संपला होता. या संदर्भातील खबर आकाशचा मोठा भाऊ अक्षय बोरकर यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेचा पुढील तपास रुपेश साळुंखे करत आहेत.