बारामती – महान्यूज लाईव्ह
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. बऱ्याच महिन्यांपासून रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार आता होईल अशा आशेवर राज्यातील शिंदे गटासह भाजपचेही आमदार डोळे लावून आहेत. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील काही नावे चर्चेत असून त्यातील कोणाचा पत्ता चालणार याची उत्सुकता आहे.
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात दौंडचे आमदार राहूल कुल, पुणे शहरातून माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवडमधून महेश लांडगे अशी भाजपकडील चर्चेतील नावे आहेत. तिघांचेही महत्व अबाधित तर आहेच, शिवाय पुणे जिल्ह्यातील जिल्हा परीषद, पंचायत समित्यांच्या निवडणूकांसाठी कुल हे भाजपकरीता संजीवनी ठरू शकतात.
पुणे शहरातील महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी माधुरी मिसाळांचा चेहरा भाजप पुढे करू शकते. त्याच तत्वानुसार पिंपरी चिंचवड ताब्यात ठेवण्यासाठी महेश लांडगे यांनाही ताकद दिली जाऊ शकते. अर्थात ग्रामीण व शहरी असा समतोल भाजपला साधावा लागणार आहे, त्यादृष्टीने विचार झाला, तर राहूल कुल हे अधिक दावेदार आहेत.
दुसरीकडे शिंदे गटाकडूनही विजय शिवतारे यांना संधी मिळणार का याची उत्सुकता आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिंदे गट शिवसेनेचे विजय शिवतारे वगळता फारसे वजनदार प्रभावशील नेतृत्व नाही, त्यामुळे सर्वाधिक श्रीमंत अशा जिल्ह्यात आपले वजन प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटही शिवतारे यांना संधी देणार का? याची उत्सुकता आहे.