वाईतील लोहारे गावातील घटना
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईतील लोहारे गावच्या स्मशानभूमीत सावडण्याच्या विधीसाठी आलेल्या ग्रामस्थांसह नातेवाईकांना आगी मोहोळाच्या मधमाशांनी अचानकपणे हल्ला केला. माशा मोठ्या संख्येने चावल्याने अंदाजे ५० हून अधिक जण जखमी झाले.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोहारे ता.वाई येथील एका वयोवृद्ध व्यक्तीचे निधन झाले. त्यांचा सावडण्याचा विधी तेथील स्मशानभूमीत होता. या विधीसाठी लोहारे गावचे ग्रामस्थ व वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील पै- पाहुणे उपस्थित होते. हा विधी उरकला आणि सर्व घराकडे परतत असतानाच स्मशानभूमीशेजारी असलेल्या चिंचच्या झाडावरून आग्या मोहोळाच्या मधमाशांनी या सर्वांना लक्ष्य केले.
मधमाशा माणसांच्या घोळक्यावर तुटुन पडल्याने माणसे आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा गावाच्या दिशेने पळू लागली, तरी देखील मधमाशांनी गावापर्यंत माणसांचा पाठलाग केला आणि लोकांना चावे घेतले.
अंदाजे ५० महिला व पुरूष या माश्यांनी चावा घेतल्याने जखमी झाले. त्यापैकी २५ जणांना वाईच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या जखमींवर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. सुजाता बचुटे, डॉ. सतीश बाबर, नेत्रतज्ञ डॉ.विठ्ठल भोईटे, आरोग्य निरिक्षक विठ्ठल पोळ, परिचारिकांनी तातडीने उपचार सुरु केला. त्यामुळे मोठी मदत झाली .