संपादकीय
गेले महिनाभर दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर महिला कुस्तीपटूंचे आंदोलन होत आहे. हे आंदोलन फक्त एका ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात होत आहे. गेली एक महिना सातत्याने आंदोलन होऊनही, दिल्ली पोलिसांनी अनेक प्रकारचे अडथळे आणूनही, हे आंदोलन सुरूच आहे. विशेषतः हरियाणा, उत्तराखंड, पंजाब अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती असूनही, त्यांचे आंदोलन चिवट असते हे माहीत असूनही, केंद्र सरकार त्याकडे ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपली प्रतिमा बदनाम करून घेत आहे हे अनाकरणीय आहे पण त्यापेक्षाही दिवसेंदिवस भाजपची प्रतिमा जनतेच्या मनातून उतरत आहे हे लक्षात घेता भाजपने आता वेळीच सावरायला हवे.
गेल्या आठ वर्षापासून देशात भाजपचे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या विषयी सुरवातीला असलेली जनतेची जनभावना, आता पुन्हा एकदा त्याचा आलेख उतरतीच्या क्रमाला लागला आहे. धक्कादायक निर्णय घेण्याची त्यांची शैली, सुरुवातीच्या काळात लोकांना आवडली, मात्र त्यानंतर त्यातून त्यांचा अहंकार दिसत असल्याची जनभावना आता तयार होऊ लागली आहे.
विशेषतः महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना मराठा मोर्चांकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष, धनगर समाजाला आरक्षणासाठी अगोदर दाखवलेली लालूच आणि नंतर केलेले दुर्लक्ष, इथपासून महाराष्ट्रात सुरू झालेले राजकारण आजही सुरूच आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या विरोधात उत्तरेकडील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन, हाथरससारख्या घडलेल्या घटना, लोकशाहीच्या प्रचलित कायद्यापेक्षा आपले कायदे वेगळे असल्याचे भासवणारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारची शैली सुरुवातीच्या काळात लोकांना आवडली, पण दिवसेंदिवस त्यातील गांभीर्य आणि अडचणी लोकांच्या लक्षात येऊ लागले आहेत आणि तरीही भाजपला त्यातून काहीच बोध घ्यावासा वाटत नाही हे मात्र कळत नाही.
भाजपचा एक खासदार ब्रिजभूषणसिंग आज भाजपसाठी अडचणीचे बनले आहेत. आजपर्यंत शाईन बागच्या आंदोलन असेल किंवा इतर कोणतीही आंदोलने असतील, ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी, आयटी सेलने, भाजपच्या प्रचार यंत्रणेने आक्रमक प्रचार करत देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल मारली, पण महिला कुस्तीपटूंना देशद्रोही संबोधता येत नाही, ठरवता येत नाही ही भाजपची फार मोठी अडचण झाली आहे.
महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप गंभीर आहेत. या आरोपांच्या दरम्यान आणि त्यांच्या आंदोलनादरम्यान कर्नाटकची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला, मात्र तरीही भाजप ब्रिजभूषण सिंग यांच्या बाबतीत कठोर भूमिका घ्यायला तयार नाही. याच्याच जागी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सरकार असते, तर याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवढा आकांडतांडव केला असता?
त्यामुळेच आता भाजप विरोधक पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये, जेव्हा भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या सरकारवर आरोप करतात, तेव्हा आता जनता त्याला अत्यंत सहजतेने घेऊ लागली आहे. भाजपचे नेतेच आणि त्यांच्या सोईस्कर भूमिका या गोष्टीला कारणीभूत आहेत, कारण भाजप म्हणेल तेच खरे अशा स्वरूपाची भावना सुरुवातीच्या काळात लोकांना बरी वाटली, पण आता ती पचनी पडायला तयार नाही.
तब्बल एक महिना उलटला, तरी सरकार महिला कुस्तीपटूंच्या, खेळाडूंच्या आंदोलनाची दखल घेत नाही. ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करायला कोर्टालाच हस्तक्षेप करावा लागतो आणि गुन्हा दाखल केल्यानंतरही ब्रिजभूषण मात्र मोठमोठ्या मिरवणूक काढत फिरत आहेत. नेहमीप्रमाणे त्याच मस्तीमध्ये महिला खेळाडूंवर प्रत्यारोप करत आहेत हे चित्र या देशाच्या प्रतिमेला साजेसे नाही.
उत्तरेकडील शेतकऱ्यांनी शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीमध्ये आंदोलन केले. सरकारने नाकाबंदी केली. ट्रॅक्टर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, याच शेतकऱ्यांना देशद्रोही बनवण्याचा प्रयत्न केला तरी देखील शेतकरी चिवटपणे आंदोलन करत राहिले. सहा महिने, आठ महिने, नऊ महिने, दीड वर्ष हे शेतकरी हे आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाची झळ सरकारला बसू लागली, तेव्हा मात्र सरकार जागे झाले. सामान्य माणसांमध्ये या सरकारविषयी नकारात्मक भावना तयार झाली आणि मग मात्र केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले. तशीच परिस्थिती दिल्लीतील जंतर-मंतरच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर येऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, प्रमोद महाजन यांचाही काळ जनतेने जवळून पाहिला आहे. समाज भावना लक्षात घेत पार्टी विथ डिफरन्स ही प्रतिमा भाजपने पुरेपूर ठसवण्याचा प्रयत्न केला आणि तसा बदलही सातत्याने केला. आज मात्र हा बदल जाणवत नाही. त्याची जागा मग्रुरीच्या राजकीय भूमिकेने घेतली आहे. अशी भूमिका भाजपसारख्या पक्षाला साजेशी नाही. तात्पुरता विजय होईल पण सर्वंकष जनतेचा विश्वास गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे भाजपने वेळीच सावध व्हावे.