निरा भिमा कारखान्यावर ऊस बिलासाठी आंदोलन..! पोलिसांनी आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह इतर अडीचशे आंदोलकांवर केले गुन्हे दाखल..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिल मिळावे यासाठी इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावर आत्मक्लेश पदयात्रा काढून आंदोलन करणारे आप्पासाहेब जगदाळे व इतर अडीचशे आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
पोलीस स्टेशनने परवानगी नाकारलेली असताना देखील शेतक-यांची गर्दी जमाव जमवुन कारखाना परीसरात मोठयाने घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व अडीचशे आंदोलकांवर इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस समाधान तुकाराम केसकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार (ता.17 मे) रोजी सकाळी 9 चे सुमारास इंदापुर पोलीस स्टेशन हददीत निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने 1 डिसेंबर पासुन अद्याप पर्यंत सभासदांचे उस बिल अदा न केल्याने आप्पासाहेब जगदाळे यांचे नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समिती बावडा यांनी जयभवानी मंदीर लाखेवाडी ते निराभिमा सहकारी साखर कारखाना गेट शहाजी नगर पर्यंत आत्मक्लेश पदयात्रा आयोजीत केली होती.
त्यापूर्वी आत्मक्लेश पदयात्रा आंदोलन आयोजकांची बैठक घेऊन कलम 149 ची नोटीस देवून त्यांना सध्या पुणे ग्रामीण जिल्हयात मा जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे समक्ष सांगीतले होते.
मात्र परवानगी नाकारलेली असताना देखील शेतक-यांची गर्दी जमाव जमवला व कारखाना परीसरात मोठयाने घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग केला म्हणून आप्पासाहेब जगदाळे (रा. सराटी ता. इंदापुर जि. पुणे), पंडीत पाटील, विजय गायकवाड, धैर्यशिल पाटील, अजित टिळेकर, महादेव घाडगे, तुकाराम घोगरे (सर्व रा. बावडा ता. इंदापुर जि. पुणे) यांचेसह इतर 200 ते 250 शेतकरी (नावे माहीत नाहीत) यांचे विरोधात सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला.