बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती व इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सख्खे भाऊ कोरोनाच्या महामारीत जग सोडून गेले..या घटनेने दोन्ही तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच बारामतीतही ८० वर्षाची आई व ६० वर्षाची लेकही या कोरोनाच्या महामारीने एकापाठोपाठ जगातून गेली. या मायलेकींच्या एकमेकांवरील प्रेमाची माहिती असणाऱ्यांना या घटनेने हेलावून सोडले.
बारामतीतील खंडोबानगरच्या मोरगाव रस्त्याशेजारील घरात लेकीने आपल्या वृध्द आईला सांभाळले होते. वयाची नव्वदी गाठलेल्या या आईला मोलमजूरी करूनही ती सांभाळत होती.. घासातला घास देत होती..बेरोजगार मुलाच्या संसाराला त्या मोलमजूरीतल्या दामातून हातभार लावत होती…परवा आईला अचानक त्रास सुरू झाला..हातपाय गळाले तिचे…तिने मोफत उपचाराचा भाग म्हणून महिला रुग्णालयात तिला दाखल केले. कोरोना निगेटिव्ह आला, मात्र सारीचा आजार त्या वृध्देला बरा करू शकला नाही…तिने जगाचा निरोप घेतला…याच दरम्यान या लेकीलाही त्रास सुरू झाला…आईपाठोपाठ तिसऱ्या दिवशी लेकीनेही जगाचा निरोप घेतला…नियती आणि महामारीचा हा कसला विचित्र योगायोगाचा खेळ आहे?
खंडोबानगर परिसरातील या घटनेने साऱ्यांचीच मने हेलावली.. ती फक्त या दोघींच्या मृत्यूनेच नाही, तर मृत्यूनंतरही या साठ वर्षीय लेकीच्या मृतदेहाला एक दिवसभर अंत्यविधी मिळालाच नाही..आजारी असणं वाईटच, उपचार न मिळणं हेही वाईटच…पण मरणानंतरही होणारी हेळसांड अधिकच वाईट नाही का? कोरोनाच्या महामारीने अनेक कुटुंबे उध्वस्त केली, त्यातील एक कुटुंब… हातावरचे पोट असणारे! हातातोंडाची मारामार असतानाही एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या कुटुंबाला कोरोनाने दृष्ट लावली..!











