स्वाब द्या, तुम्ही स्वतः व कुटुंबाच्या कोरोनाच्या नियंत्रणात मोठी भूमिका बजावू शकता..
बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोना कसा होतो हे सर्वांना माहिती झाले, मात्र अजूनही कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणीसाठी जायचे लोक टाळत आहेत, त्यातून उशीर होऊन प्रकृती बिघडली, ऑक्सिजन कमी झाला की, मग बेडही मिळणे मुश्कील होते आणि सारे वातावरणच बिघडून जाते..अशावेळी कोरोनाची तपासणी अवघ्या काही मिनीटांत पूर्ण होणारी प्रक्रिया म्हणून रॅपिड अॅंटिजेन तपासणीला महत्व येऊ लागले आहे. शासकीय पातळीवरही व खासगी प्रयोगशाळांमध्येही आता रॅपीड अॅंटीजेन चाचण्या होऊ लागल्या आहेत. बारामतीत सर्वप्रथम कोरोनाची चाचणी खासगी प्रयोगशाळेत सुरू झाली, आता सर्व तालुक्यांमध्ये ही चाचणी खासगी प्रयोगशाळा करू लागल्या आहेत.
कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्रावाचा नमुना कसा घेतला जातो, पहा… हा व्हिडीओ येथे अथवा महान्यूज लाईव्हच्या फेसबुक पेजवर पाहू शकता..
शासकीय आरटीपीसीआर व सीबीनॅट या चाचण्या विश्वासार्ह आहेतच, मात्र त्यांचे निकाल येण्यास विलंब लागतो. काही तालुक्यांमध्ये हे अहवाल येण्यास १२ ते २४ तास लागलेले आहेत. अशावेळी ज्या रुग्णांना लक्षणे आहेत,त्रास होतो आहे, अशा रुग्णांना निश्चित व योग्य उपचार सुरू करण्यासाठी विलंब होत होता. त्यातून अधिक वयाचे, जोडीला गंभीर विकार असलेल्या रुग्णांची प्रकृती बिघडत होती. त्यामुळे अशा रुग्णांसाठी रॅपीड अॅंटिजेन चाचण्या रामबाण ठरल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल लवकर मिळतात, परिणामी उपचारही सुरू करण्यासाठी वेळ मिळतो आहे.
अर्थात या चाचण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रक्रियेतून रुग्ण कोरोनाबाधित नसला तरी पॉझिटिव्ह येत असल्याच्या तक्रारी व अफवा सुरू आहेत. मात्र याच चाचण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी वेग आला आहे हेही निश्चित.
यासंदर्भात बारामतीतील मंगल लॅबोरेटरीचे प्रमुख डॉ. पंकज गांधी यांनी अधिक माहिती दिली. कोरोनाची रॅपीड अॅंटिजेन चाचणी कधीही खोटी पॉझिटिव्ह येऊ शकत नाही, आलीच तर खोटी निगेटिव्ह येऊ शकते असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले,` स्वाब घेण्याच्या पध्दतीमुळे कोरोनाच्या चाचण्यांमधील निष्कर्षांवर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे घशातील स्त्रावाचा नमुना शास्त्रीय पध्दतीने घेतला, तर कोरोना आहे की नाही याची निश्चित खात्री पटविणारे निष्कर्ष मिळू शकतात. कोरोनाची तपासणी करताना ज्यांना लक्षणे आहेत, त्यांनीच करावी. रॅपीड अॅंटिजेन ही पध्दत तातडीच्या उपचार पध्दतीसाठी रामबाण उपाय ठरत आहे. अर्थात लक्षणे आहेत, त्रासही होतो आहे, मात्र रॅपीड अॅंटीजेन चाचणी निगेटिव्ह आली, तर अशा रुग्णांनी आरटीपीसीआर ही तपासणी केली पाहिजे.











