सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : आपण भाई व्हावे अशी इच्छा मनाशी बाळगून अलिकडील तरुण पिढी गुन्हेगारी कडे वळू लागली आहेत. इंदापूरच्या ग्रामीण भागातही आता अशा गावठी भाईंचे पेव फुटले आहे. काटी गावात भाई होऊ पाहणा-या एका युवकास बेकायदेशीर गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
संग्राम विलास मदने (वय २७ वर्षे, रा.काटी, ता. इंदापूर जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बेकायदेशीर, विनापरवाना पिस्टल बाळल्यामुळे त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
याबाबत माहिती अशी की, दिनांक १५ मे रोजी दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास गुन्हे शोध पथकास काटी ता. इंदापूर, जि. पुणे येथील वेताळ बाबा मंदिरा जवळ इसम नामे संग्राम विलास मदने (वय २७, रा. काटी, ता. इंदापूर जि.पुणे) हा त्याच्या कंबरेला गावठी पिस्टल लावून थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्याप्रमाणे गुन्हे शोध पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना झाले. संशयित इसम संग्राम मदने यास पोलीस आल्याचे चाहूल लागताच तो सदर ठिकाणाहून पळून जावू लागला. पण इंदापूर पोलीसांसमोरुन पळून जाण्याची त्याची काय बिशाद. पथकाने पाठलाग करून पकडून त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल व पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले.
त्यास ताब्यात घेवून त्याने बेकायदेशीर विना परवाना पिस्टल जवळ बाळगल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आलेली. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, नागनाथ पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, विनोद लोखंडे, गजानन वानूळे, गणेश डेरे ,अकबर शेख, विकास राखुंडे, होमगार्ड संग्राम माने यांनी केली.
दरम्यान या संशयित आरोपीबरोबर गावातील काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र त्यांना चौकशी करुन सोडण्यात आल्याची चर्चा आहे. तालुक्यातील एका राजकीय नेत्याने याप्रकरणी लक्ष घातले होते असे समजते. मात्र काहीही झाले तरी इंदापूरच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची सुरक्षितता धोक्यात आली आहे हे मात्र नक्की..