दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई शहरातील ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूलच्या चौकातील पटेल चिकन शॉपसमोर कारने ३ दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यात एका तीन वर्षीय बालकाला आपला डावा हात गमवावा लागला.
लहान बालकाची काहीच चुक नसताना या वयात त्याला आपला हात गमवण्याची वेळ यावी हे चित्र पाहणाऱ्या सर्वांनच गलबलून आले. यासंदर्भात वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेळे (ता.वाई) येथील गुलाबराव हरिभाऊ जाधव (वय ६५) ही व्यक्ती कारमधून त्याच्या कुटुंबियांसह वाई शहरातून जात असताना पटेल चिकन शॉप समोरील स्पीडब्रेकर जवळ आली.
त्या वेळी पुढे तीन दुचाक्या चालल्या होत्या. पुढे स्पीडब्रेकर असल्याने दुचाकी चालकांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला, त्याचवेळी कारने पुढील तीन दुचाकीचालकांना पाठीमागून जोराची धडक दिली.
यात संगीता अरुण भिसे (वय ३०), राहुल अरुण भिसे (वय २८), सोनाली नारायण भिसे (वय २१),
फाजल रुबा पटेल (वय २७), शेर मोहम्मद पटेल (वय ६) व सलमान अली पटेल (वय ३ वर्षे) हे गंभीर जखमी झाले..
या अपघातानंतर वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे हे सहाय्यक निरिक्षक आशिष कांबळे, फौजदार के.डी.पवार, हवालदार मदन वरखडे, महिला हवालदार एस. एस. मुजावर, श्रीनिवास बिराजदार,दाभाडे, नेवसे, श्रीकांत कांबळे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालय पाठवून अपघात केलेली कार व गुलाबराव हरिभाऊ जाधव यास ताब्यात घेतले व त्याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत .