दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई, दि .१६ : वाई तालुक्यातील उडतारे गावात बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाने घरातील देवळीत ठेवलेल्या किल्लीद्वारे सहज प्रवेश करून त्याने सहज सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पण हीच त्याची चोरी त्याच्या आजवरच्या इतर चोऱ्या उघड करणारी ठरली आणि पोलिसांनी तब्बल दहा दुचाक्यांसह दागिने त्याच्याकडून हस्तगत केले.
जिल्ह्याच्या विविध परिसरातुन दुचाकी वाहने चोरणारा पोलिसांना नेहमीच गुंगारा देऊन चपळाईने पळून जाणारा ऊडतारे (ता.वाई) येथील अट्टल गुन्हेगार योगेश संदीप बाबर (वय १९ वर्ष) याला सापळा रचून ताब्यात घेतले आणि पोलिसांचे देखील डोळे विस्फारले. कारण त्याने भुईंज पोलिस ठाणे हद्दीत २ घरफोड्या, वाई पोलिस ठाणे हद्दीत १, शिरवळ पोलिस ठाणे हद्दीत १ व इतर ४ ठिकाणाहून दुचाक्या चोरुन नेल्याची कबुलीच सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासमोर दिली .
यासंदर्भात भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास उडतरे गावच्या शुभांगी संजय साबळे, (वय – ४० वर्षे या शेतात गेल्या असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाजा शेजारी असणाऱ्या देवळीत ठेवलेली घराची चावी घेतली व घरातील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली.
याची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात दाखल झाली. भुईंजचे सहाय्यक निरिक्षक रमेश गर्जे यांनी फौजदार रत्नदीप भंडारे, पोलिस हवालदार बापुराव धायगुडे, आनंदा भोसले, जितेंद्र इंगुळकर, शंकर घाडगे, रवीराज वर्णेकर, सागर मोहिते, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलवडे यांचे पथक तयार केले.
हे पथक गुन्ह्याचा तपास करत असताना असे लक्षात आले की ही चोरी कोणीतरी गावातीलच ज्याला चावी कुठे ठेवतात हे माहिती आहे, अशा ओळखीच्या माणसानेच केलेली असावी या संशयापर्यंत हे पथक पोहचले. दरम्यान ही चोरी उडतारे गावातीलच योगेश संदीप बाबर या अट्टल गुन्हेगाराने केली असल्याची माहिती खास खबऱ्याकडून गर्जे यांना मिळाली. त्याप्रमाणे योगेश याला ताब्यात घेतले व चौकशी केली.
त्याने चोरलेले सर्व दागिने त्याचा मामा रमेश दिनकर दुदुस्कर, (वय – ४० वर्षे, रा. सोनगाव, ता.जावली, जि.सातारा) याचेकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगीतले. त्या प्रमाणे त्याच्या मामाला या चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेवुन सहआरोपी करुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली, तेव्हा त्याने याची कबुली दिली.
दरम्यान भुईंज पोलिसांच्या हद्दीत योगेश आणि आणखी एक चोरी केल्याचे उघडकीस आले तर भुईंज, वाई व शिरवळ या ठिकाणी चार दुचाकी त्यांनी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर आणखी सविस्तर पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा मेढा व सातारा या हद्दीतही इतर साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यावरून आणखी दोन संशयतांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मेढा व सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन अशा चार दुचाक्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या.