दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका परिसरातील विरमाडे गावच्या हद्दीतील हॉटेल महाराजासमोर बेकायदेशीर पिस्तूल विक्री होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. यात तीन जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून पाच पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असा सुमारे 3 लाख 27 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.
मिळालेली माहिती अशी की, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्रे विक्री करणाऱ्यांवर पाळत ठेवून आहेत. देवकर यांना खास खबऱ्याकडून माहिती मिळाली की, वाई तालुक्यातील विरमाडे येथे पिस्तूल विक्रीला काही लोक येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 13 में रोजी सापळा रचला. त्यावेळी हॉटेल महाराजा समोर पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेला महेंद्र प्रकाश पावरा (वय 22, रा.उमटी जि. जळगाव), हे पिस्तूल विकत घेणारे वैभव बाळासो वाघमोडे (वय 21, रा.बलगवडे जि. सांगली), अशोक विठ्ठल कार्वे(वय 58 रा, येरवळे ता.कराड) यांच्याकडून 5 देशी बनावटीची पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे असा सुमारे 3 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. या संदर्भात तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे हे तपास करत आहेत