जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
लक्ष्यवेध : डॉ. संताजी शेळके, मानसोपचारतज्ज्ञ बारामती.
सन २०२० सालामध्ये “कोरोना” नंतर जर कुठला शब्द जास्त वेळा ऐकला गेला असेल, वाचला गेला असेल आणि बोलला गेला असेल तर तो आहे; “आत्महत्या”!
आत्महत्या याविषयी बोलणं सामाजिक व वैयक्तिक पातळीवर नेहमी टाळलं जातं. पण यावेळी याविषयी एवढं बोललं गेलं, कारण यावर्षी बऱ्याच सुपरस्टार सेलिब्रिटी लोकांनी आत्महत्या केल्या. त्यांचे आत्महत्येचे प्रयत्न, त्यांनी केलेली आत्महत्येची तयारी, त्यांच्या नशीली पदार्थांच्या सवयी, त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना केलेले फोन एस. एम. एस. इत्यादी खमंग वर्णने आपल्याला मिडीयामधून वाचायला मिळाली.
आता तुम्हाला एक गुपित सांगतो, आत्महत्या या विषयाच्या संशोधनानुसार, त्यामध्ये “कॉपीकॅट सुसाईड” नावाचा एक प्रकार असतो. यामध्ये जेव्हा एखादी सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा त्यांचे चाहते, तशाच पद्धतीने नशीले पदार्थ वापरण्याचा व तसाच सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्हाला एक जमेची गोष्ट सांगतो, जर मीडियामधून अशा सेलिब्रिटीच्या आत्महत्येचे अति रंजक व सांगोपांग वर्णन करणे टाळले, तर या “कॉपीकॅट सुसाईड” प्रकारच्या आत्महत्या आपण रोखू शकतो. अजून एक सत्य तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, जर आपण नशील्या पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलो, तर आपण बऱ्याच अंशी आत्महत्येपासून दूर गेल्यासारखे आहे.
एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार आल्यानंतर, त्याचा उपचार आणि त्याचा प्रतिबंध याकडे लक्ष दिले पाहिजे. आता तुम्हाला एक चांगली बातमी सांगतो, आत्महत्येचा विचार मनात असणारी प्रत्येक व्यक्ती, आपले हे विचार, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, आपल्या सर्वात जवळच्या प्रिय व्यक्ती जवळ किंवा प्रिय मित्राजवळ बोलून दाखवते. आपण जर अशा एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या संपर्कात असाल, की जो आत्महत्या करण्याविषयीचा विचार बोलून दाखवतो, तर तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही आत्महत्येविषयी त्या व्यक्तीकडून ऐकता, तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका, त्याचा मुद्दा खोडू नका आणि त्याला हसण्यावारी नेऊ नका. त्याला लागलीच कसलाही सल्ला देण्याचा किंवा तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करू नका. त्याचे सगळे विचार व कल्पना बिनशर्त, वेळ देऊन व शांतपणे ऐकून घ्या. त्याची मनस्थिती व परिस्थिती समजून घ्या. त्याला मानसोपचारतज्ञ डॉक्टरांना भेटण्याचे, औषधोपचाराचे महत्व लक्षात आणून द्या व त्याबद्दल त्याची मनधरणी करा. यावेळी त्याला सहानुभूती व आस्था दाखवणे गरजेचे आहे.
आता एक साधंसोपं तत्व, आपल्या भावना व विचार ऐकून घेणारं, आपल्याला समजून घेणारं कोणी आहे, आपलंही कुणी आहे आणि आपणही कुणासाठी तरी आहोत, आपणहि कशासाठी तरी महत्त्वाचे आहोत आणि आपल्या जगण्यालाही काही अर्थ आहे, ही भावना आपल्याला आत्महत्येच्या विचारांमधून बाहेर काढण्यास मदत करते.
खरे पाहता आत्महत्या प्रतिबंध म्हणजे आपल्या विचारांची व मूल्यांची मूळ जडणघडण. आपल्या धारणांची, मान्यतांची व विश्वासांची जडणघडण होत असतानाच, आपण आत्महत्या प्रतिबंधाचा पाया घडवत असतो. जी मुलं अतिशय श्रीमंत कुटुंबात वाढतात किंवा ज्यांचे सर्व हट्ट लागलीच पूर्ण होतात किंवा ज्यांच्या पालकांकडे मुलांसाठी बिलकुल वेळ नसतो, त्यांचे जीवन बऱ्याच वेळा वेगवेगळ्या दुःखांनी आणि वेदनांनी भरलेले असते. मुळात अशा मुलांना लहानपणापासून खूप सारे विशेष अधिकार असतात, जे बाकी सामान्य मुलांना कधीही मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये “स्वत:च्या हक्कांची” एक जाणीव तयार होते आणि त्यामुळेच प्रत्येक गोष्टीवर त्यांचा हक्क आहे अशी एक भावना तयार होते.
स्वतःच्या हक्कांची ही तीव्र भावना आपल्याला नेहमी आपले हक्क मागण्यास भाग पाडते. त्याच वेळी कोणीतरी आपले हक्क आपल्याला मिळवून द्यावेत अशीही भावना आपल्याला होते. आपले हक्क दिले नाहीत तर, आपल्यावर अन्याय व अत्याचार झाल्याच्या भावनेतून सूडबुद्धीचा ऊगम होतो. मग स्वतः काही मिळवण्यापेक्षा, तो माझा हक्क आहे असं म्हणत, तो मिळवण्यासाठी ते कोणतेही प्रयत्न करायचे सोडून देतात. कुठलाही संघर्ष किंवा कुठलेही आव्हान न स्वीकारून, त्यातून शिकण्याची किंवा वाढण्याची संधी ही मुले वाया घालवतात. ही मुले त्यांच्या पालकांनी आणि नातेवाइकांनी त्यांच्या समोर ठेवलेला रेडीमेड मार्ग आणि समस्या समाधान स्विकारतात व नेहमीच असमाधानी व असंतुष्ट असतात.
आता हे लक्षात घेऊया की, ज्या ठिकाणी सतत निरीक्षण, परीक्षण, शिक्षण, वाढ आणि स्वयंशिस्त अशा प्रकारचे वातावरण असते, त्या ठिकाणी मुलांची वाढ अतिशय सदृढपणे होते. अर्थात अशा प्रकारचे वातावरण स्वतःभोवती व आपल्या मुलांभोवती तयार करणे हे प्रत्येक पालकाचं प्रथम कर्तव्य आहे, व हेच प्राथमिक आत्महत्या प्रतिबंध आहे.
कोणालाही जर विचारलं की, “तुमच्या आयुष्यातला सर्वात जास्त आनंदाचा क्षण कोणता?” तर मित्रांनो, उत्तर असेल, आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या अडथळ्यांवर मिळवलेल्या विजयाचा क्षण. म्हणून दैनंदिन अडथळ्यांना अडचणी, कटकटी, समस्या किंवा डोकेदुखी म्हणण्याऐवजी एक आव्हान म्हणून स्वीकारावे, हे बरे. हा दृष्टिकोन आपल्याला नेमकं जे काही हवं आहे, ते मिळविण्यास मदत करतो. आपल्याला नको असणाऱ्या आत्महत्येसारख्या गोष्टींपासून दूर नेत, हव्या असणाऱ्या गोष्टींकडे घेऊन जाणारा हा दृष्टिकोन, आपल्याला जीवनाकडे घेऊन जाईल.
निराशेच्या तीव्र भावना, मुलांच्या प्राथमिक गरजा दुर्लक्षित राहिल्याने व असहाय भावनेतून तयार होतात. निराश लोकांच्या सान्निध्यात राहणे, त्यांचे विचार ऐकणे, त्यांना कृती करताना पाहणे, त्यांची वक्तव्यं ऐकणे, त्यांच्या प्रतिक्रिया पाहणे आणि त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया आपणही द्यायला शिकणे व तशाच प्रकारचा विचार करायला आपणही शिकणे, यामधून आपले फार मोठे नुकसान होत असते. इथे एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, की वारंवार आशादायक विचार करून, सकारात्मक कृती करून आणि आपल्या मनाला तशी सवय लावून, आपण योग्य वेळी योग्य आशादायक व सकारात्मक विचार आपल्यासाठी निवडू शकतो.
आपल्यासाठी सोयीचे असणाऱ्या वातावरणात राहण्याची आपल्याला खूपच जास्त सवय असते. परंतु खरी गोष्ट तर ही आहे की वातावरण हे नेहमीच बदलत असते. वातावरणात ज्याप्रमाणे बदल होतात त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करणे खूप गरजेचे असते. जेव्हा आपण काहीतरी सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागलेले असतो तेव्हा वातावरणामध्ये आपल्याला हवे तसे बदल करावे लागतात. हे आपल्याला हवे असणारे बदल करण्यासाठी, आपल्याला प्रथम स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात.
खरा कम्फर्ट झोन किंवा आरामक्षेत्र तर आपण दररोज काहीतरी नवीन शिकण्यामध्ये आणि स्वतःमध्ये वाढ करण्यामध्ये आहे. आपलं आरामक्षेत्र तर, असं काही बनण्यामध्ये आहे, की जे आपल्याला बनायचे होते किंवा बनायचे आहे किंवा जी आपली स्वप्नं व आशा आकांक्षा आहेत. आता एक गुपित सांगतो, जर आपल्याकडे ज्वलंत इच्छा, जबर ध्येयासक्ती, आशावादी भविष्यचित्र आणि अर्थपूर्ण जीवनमूल्ये असतील तर कोणताही आत्मताडनाचा किंवा आत्मइजेचा विचार एका क्षणापेक्षा जास्त वेळ टिकणार नाही.
आत्मताडन म्हणजे नकारात्मक व टाकाऊ शब्द स्वतःसाठी वापरणे, उदा. मूर्ख, अक्षम्य, अपयशी, नपुंसक, नालायक, ढ, जंगली, गावंढळ, शून्य, षंढ, बिनकामाचा, भुईला भार इत्यादी. आत्मइजा म्हणजे स्वतःला लहान सहान इजा स्वतःहून करवून घेणे उदा. रागे भरणे, चिडचिड करणे, अती खाणे, सुस्त जीवनपद्धती, महत्वाची कामे पुढे ढकलणे व टाळणे, तंबाखू खाणे, सिगारेट पिणे, दारू व तत्सम नशील्या पदार्थांचा वापर करणे, नेहमीचा उपचार बंद करणे, योग्य उपाययोजना व उपचार नाकारणे इत्यादी. आत्मताडन व आत्मइजा हे आत्महत्येच्या विचारांचे सुक्ष्म स्वरूप आहे, त्यावरही लक्ष ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
आपण आपल्या स्वतःच्या परिस्थितीचे आणि वातावरणाचे “बळी आहोत” अशी जर आपण आपली समजूत करून घेतली असेल, तर या समजुतीतून लवकरात लवकर बाहेर पडणं हे खूप गरजेचे आहे. या विचारातून बाहेर पडल्यावरच आपल्याला परिस्थितीशी व वातावरणाशी झगडण्याची शक्ती व शिस्त येऊ शकते. दुसऱ्यांना दोष देऊन, दुसऱ्यांना नावं ठेवून, आपल्या परिस्थितीला दोष देऊन, आपल्या भूतकाळाला दोष देऊन आणि वर्तमानकाळाला नावे ठेवून, आपण आशावादी भविष्यकाळाकडे पाहू शकत नाही.
आपण ज्या गोष्टींना आपल्या समस्यांसाठी जबाबदार धरतो, त्याच गोष्टींमध्ये त्याचं उत्तरंही शोधतो. आपलं स्वतःचं, आपल्या स्वतःच्या विचारांचं, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचं निरिक्षण व परिक्षण करावं. आपल्या जीवनातील गोष्टींची व घटनांची कारणमीमांसा करण्यास शिकावं. आपल्याला आयुष्याच्या एका ठराविक वळणावर, एखाद्या गोष्टीची सत्यता कळून येते आणि ती गोष्ट आपल्या मनात रूजते. या आपल्या मनात पेरलेल्या व रूजलेल्या गोष्टी ठरवतात, की आपण कशाप्रकारे वागणार आहोत, कशाप्रकारे बोलणार आहोत आणि कशाप्रकारे कृती करणार आहोत.
अर्थात आपण स्वतःमध्ये कोणत्या गोष्टी व सवयी रूजवणार आहोत, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. जर या मनामध्ये पेरलेल्या व रूजलेल्या गोष्टी योग्य प्रकारे आपल्याला प्रोग्रॅम आणि री प्रोग्रॅम करता आल्या, तर आपण नक्कीच आपल्या वातावरणावर आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर नियंत्रण करू शकतो. आपले, आपल्या जीवनाचे आणि आपल्या वातावरणाचे नियंत्रण आपल्या हातात आहे, ही गोष्ट आपला आत्मसन्मान व आत्मविश्वास उंच पातळीवर नेऊन ठेवते. उंची आत्मविश्वास व आत्मगौरव असणारी व्यक्ती, आत्मईजा, आत्मताडन व आत्महत्या यांपासून सुरक्षित असते.
स्वतःचं निरीक्षण आणि परीक्षण करायचे की, कुठल्या एका भावनेचा पगडा आपल्या वागण्यावर, बोलण्यावर आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्यावर आहे. जर या पगडा असणाऱ्या भावना, नकारात्मक असतील आणि त्या भावनांमधून बाहेर पडायला आपण तयार नसलो, त्या भावनांचा त्याग करायला आपण तयार नसलो, तर आपलं वातावरण कितीही चांगलं असो, आपल्याला त्या वातावरणाशी समायोजन करणं, जुळवून घेणं कठीण जाणार आहे.
त्यासाठी आपल्या नकारात्मक भावनांना वेळीच ओळखून व स्विकारणं, त्यांना नाव देणं, भावनांचं समजून-उमजून वैचारिक विश्लेषण करणं आणि भावनावश विचारांना सद्सद्विवेकाच्या तराजूतून तोलून घेणं, ही एक खूप गरजेचे गोष्ट आहे. आपण आपल्याला स्वतःला आपल्या विपरीत परिस्थितीचं आणि आपल्या नकारात्मक भावनांचं बळी बनण्यापासून किंवा गुलाम होण्यापासून, आपण स्वतःच रोखू शकतो.
संसर्गजन्य आजारच फक्त एकमेकांमध्ये पसरतात असे नाही, तर आपले सकारात्मक किंवा नकारात्मक विचार व द्रुष्टीकोनसुद्धा एकमेकांमध्ये पसरत असतात. आपण जर नेहमीच नकारात्मक द्रुष्टीकोन व नकारात्मक चेतना असणाऱ्या लोकांच्या संपर्कात असू, तर त्यांची नकारात्मक उर्जा नक्कीच आपल्या विचार व द्रुष्टीकोनावर नकारात्मक परिणाम करते. तीच नकारात्मक उर्जा आपल्यामध्ये आपल्या वर्तनातून व बोलण्यातून दिसायला सुरुवात होते. म्हणून दोस्ती किंवा संग करताना नेहमी सकारात्मक मनोवृत्तीच्या आणि सकारात्मक चेतना असणाऱ्या लोकांशी करण्याची खबरदारी घ्यावी.
नकारात्मक लोकांशी असणारी मैत्री, हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या क्षेत्रांतील यशस्वी आणि निष्णात लोकांशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करावा, त्यांचे सकारात्मक विचार व द्रुष्टीकोन आपलेसे करावेत. असे केल्यास आपण स्वतःकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवू शकतो व स्वतःसाठी शिकायला व वाढायला पोषक वातावरण तयार करतो.
नकारात्मक, अपयशी व निराशाग्रस्त लोकांमध्ये राहून, त्यांचे सल्ले घेऊन आणि त्यांची ऊर्जा घेऊन आपण अपेक्षा ठेवण्याची व त्या पूर्ण होण्याची स्वप्नं पाहू शकत नाही, हे सत्य तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. आता एक स्व:इच्छापूर्ती करणारं तत्व ऐका, सकारात्मक विचार व द्रुष्टीकोन असणाऱ्या लोकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध बनविण्याचा प्रयत्न केल्यास, तसेच त्यांच्याकडे शत्रू व विरोधक म्हणून न पाहता, मित्र म्हणून पाहिल्यास, आपणही सकारात्मक विचारांनी व द्रुष्टीकोनांनी भरून पाऊ. जेव्हा असे सकारात्मक विचार व द्रुष्टीकोन आपल्या वागण्यात दिसतील आणि सकारात्मक लोक आपल्या अवतीभोवती असतील, तेव्हा आपण आत्महत्येच्या विचारांपासून खूप खूप दूर असू.
आयुष्यात आलेल्या कितीही लहानमोठ्या बदलाला, समस्येला, अडचणीला, प्रश्नाला आणि आव्हानाला काहीतरी अर्थ आहे, तो अर्थ व त्यायोगे गवसणारा जीवन मूल्याधिष्ठित सन्मार्ग मी शोधणारच, हा विश्वासच, खर्या अर्थाने आपले आत्महत्येविरोधी लसीकरण असेल. आणि आश्चर्य म्हणजे ही लस आपण स्वतःच शोधणार आहोत, बनवणार आहोत व टोचणार आहोत. मग उठा, कशाची वाट बघताय, लवकरात लवकर ही लस स्वतःला टोचून घ्या, व स्वतःला आत्महत्या प्रतिबंधित करण्यास सुरुवात करा.
शुभस्य शिघ्रम!










