महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कोरोनाच्या काळात पुण्यात सामाजिक काम करणा-या इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ ह्युमन व्हॅल्यूज व आर्ट आॅफ लिव्हिंगचा विशेष सन्मान पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आला.
उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्ट आॅफ लिव्हिंग परिवारातील महाराष्ट्राचे अॅपेक्स मेंबर शेखर मुंदडा आणि आयएएचव्हीचे प्रतिनिधी आदित्य जोशी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ ह्युमन व्हॅल्यूजच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाणेर येथे नव्याने बांधलेल्या कोविड केअर विशेष रुग्णालयात १० व्हेंटिलेटर देण्यात आले. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ कोटींची वैद्यकीय उपकरणे, आॅक्सिजन पाईपलाईन, बेड्स, अन्न, अन्नधान्य, स्कॅनर, मास्क, पीपीई किट, फेस शील्ड देण्यात आली आहेत.
आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाने आणि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ ह्युमन व्हॅल्यूज महाराष्ट्र प्रमुख रमेश रमन व अध्यक्ष दर्शक हाथी यांचे सहाय्य या कार्यासाठी मिळाले. सीएसआरच्या माध्यमातून ही मदत उभी करण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या विनंतीवरुन ही मदत करण्यात आली.
इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ ह्युमन व्हॅल्यूजच्या सहाय्याने पुण्यामध्ये कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर २००० पीपीई किट्स, २००० फेस शिल्ड, २००० एन ९५ मास्क, ७ स्वॅब बूथ, ३०० थर्मामीटर, १५० पल्स आॅक्सिमीटर, ५०० इम्यूनिटी बूस्टर ड्रॉप्स , कंटेनमेंट झोनसाठी १० हजार रेशन किट, २००० नाडी आॅक्सिमीटर, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिसांसाठी २५ हजार मास्क, ८ लाखांची ३ एचएफएनसी मशीन, कोविड केअर सेंटरसाठी १६०० बेड आजपर्यंत देण्यात आले आहेत. याशिवाय इतर वैद्यकीय उपकरणे नायडू रूग्णालयात संस्थेच्या वतीने पुरविली जात आहेत.











