सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ही जन्मभूमी असणारे व सध्या मावळ तालुक्यात कार्यरत असणारे गुणवंत शिक्षक साहित्यिक व निवेदक संजय जगताप यांना उटी तामिळनाडू येथील ‘भूषण युनिव्हर्सिटी ऑफ इंडियन अँड फॉरेन स्टडीज’ या विद्यापीठा मार्फत शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मानद डॉक्टरेट’ प्रमुख अतिथीच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी विद्यापीठ ऑनररी रजिस्ट्रार डॉ. रामन त्रिवेदी उज्जैन मध्यप्रदेश , प्रो.डॉ.एस. चेल्लादुराई, पी.एच.डी.असोसिएट; प्रो .डॉ रामोई हेनी डायरेक्टर मीडिया डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली ; पी मोहन नायर डायरेक्टर CTTE केरळ ; डॉ विश्वनाथ प्रिन्सिपॉल कर्नाटक ; डॉ.एम काधीर्वेल तामिळनाडू ; डॉ. आर सुरेशबाबू, सूचना व प्रसारण मंत्रालय नवी दिल्ली हे उपस्थित होते.
संजय जगताप यांना डॉक्टरेट मिळाल्यावर शिक्षक, ग्रामस्थ, साहित्यिक क्षेत्रातील नामवंत मंडळी त्याचप्रमाणे त्यांचे मित्र परिवार, तसेच त्यांचे असणारे मुळगाव निमगाव ग्रामस्थांनी व मावळ तालुक्यातील ग्रामस्थ व मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.
संजय जगताप शिक्षक व साहित्यिक म्हणून कार्य करताना त्यांनी पाच पुस्तकांचे लेखन केले असून त्यांचे विविध विषयावरील ३५० लेख व कविता विविध वर्तमानपत्रे मासिके यामधून प्रकाशित झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय अभ्यासदौरा सिंगापूरमध्ये यशस्वी सहभाग घेऊन सिंगापूर शिक्षण पद्धती वरील माहिती अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला आहे. इंडोनेशिया येथील आंतररष्ट्रीय शिक्षण परिषदेत सहभागी होऊन तेथील शाळांचा माहिती अहवाल प्रकाशित केला आहे. विश्व मराठी काव्य संमेलन दुबई येथे निवड होउन तेथे काव्य सादरीकरण केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाच वेळा त्यांच्या कवितांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद निर्मित पुस्तकांच्या निर्मिती साठी त्यांनी समितीवर काम केले आहे.
शिक्षण संजीवनी या विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपयुक्त वेबसाईटची निर्मिती करून त्याचे प्रसारण शिक्षण सचिवांच्या हस्ते केले आहे विद्यार्थ्यांमध्ये कविता लेखनाची आवड निर्माण करून त्यांची पाच हस्तलिखित व काव्यसंग्रहाची निर्मिती व प्रकाशन शिक्षणमंत्री यांच्या हस्ते केले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या स्मरणिका निर्मिती कमिटीत सक्रिय काम करून तिचे प्रकाशन राज्यपाल व आयुक्त यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. आपल्या कवितांचे पाच रेडिओ केंद्रावर वाचन केले आहे.
कला व सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली मार्फत आयोजित कार्यशाळा नवी दिल्ली, जयपूर तसेच उदयपूर राजस्थान येथे त्यांनी यशस्वी सहभाग घेतला असून भारतीय संस्कृती वरील लेख प्रकाशित केले आहेत. पुणे विद्यापीठाची पी.एच.डी पात्रता परीक्षाही ते उत्तीर्ण झालेले आहेत. ककसाड या राष्ट्रीय व अपेक्षा व प्रबोधन यात्री दोन राज्य मासिकासाठी सहसंपादक म्हणून ते काम पाहत आहेत. दिल्ली व बिहार येथील प्रथितयश दोन लेखक कवींच्या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी मराठीत केला आहे.
वरील कार्याबद्दल त्यांना ५ राष्ट्रीय ३ आंतरराष्ट्रीय व ७ राज्यस्तरीय सन्मान व प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. शिक्षण मंत्री व विविध मान्यवरांची अनेक अभिनंदन पत्रे त्यांना प्राप्त झाली आहेत.
“मानद डॉक्टरेट” साठी संजय जगताप यांनी आपला ५३० पानाचा साहित्यिक व शैक्षणिक लेखन व कार्य अहवाल सादर करून आलेल्या एकूण ३५९ प्रस्तावांमधून त्यांची निवड वरील सन्मानासाठी करण्यात आली.त्यांची आगामी तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आयुष्यातील खूप मोठे स्वप्न साकार झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांना प्राप्त सन्मानाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सुरेश मिसाळ यांनी संजय जगताप यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या..