राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील मयुरेश्वर अभयारण्यात कारखान्यातील दूषित सांडपाणी टँकरने आणुन टाकले जात आहे. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून संबंधित टँकर चालक व मालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती सुपे मयुरेश्वर वनविभागाचे अधिकारी अतुल जैनिक यांनी दिली.
दौंड तालुक्यातील कुसेगाव, पडवी, देऊळगावगाडा आदी परिसर हा मयुरेश्वर अभयारण्याने व्यापला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर पावसाळ्यात एक पर्यटन स्थळ म्हणून याकडे पाहिले जातो. या अभयारण्यात वन्यप्रेमी व पक्षांची संख्या मोठी आहे. मात्र मागील काही दिवसांपासून कुसेगाव – पडवी च्या हद्दीतील अभयारण्यात परिसरातील कारखान्याचे दूषित सांडपाणी टँकरद्वारे आणून टाकले जात असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराची गंभीर दखल सुपे मयुरेश्वर अभयारण्य वन विभागाकडून घेण्यात आली आहे. हा टँकर निराणी ग्रुप तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचा असल्याची प्राथमिक माहिती वनविभागाला मिळाली आहे. याबाबत मयुरेश्वर वन विभागाचे वन अधिकारी अतुल जैनिक यांनी माहिती मिळतात तातडीने या प्रकारची दखल घेतली. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी पाठवून त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला आहे. संबंधित टँकर चा क्रमांक टँकर चालक व मालक यांची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या सांडपाण्यामुळे वन्यजीव प्राण्यांच्या आरोग्य व जीवितेला धोका आणि हानी होऊ शकते. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून करण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी अतुल जैनिक यांनी दिली.
दरम्यान, कुसेगावचे माजी सरपंच मनोज फडतरे यांनी मयुरेश्वर वनविभाग व प्रदुषण नियंत्रण विभागाकडे संबंधित टँकरवर गुन्हे दाखल करावेत तसेच तालुक्यात आणखी किती ठिकाणी अशा दुषीत सांडपाणी टॅंकर द्वारे टाकले जात आहेत याची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.