दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाईच्या नविन कृष्णा पुलावर नो पार्किंग झोन असताना देखील शेकडो दुचाक्या पार्क केल्या जातात, आज पोलिसांनी याकडे नजर वळवली आणि धडक कारवाईला सुरवात करताच दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली..
वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी आज फौजदार के. डी. पवार, हवालदार मदन वरखडे, महिला हवालदार शमशाद मुजावर, शांताराम शेलार, रामदास पवार, निलेश देशमुख, सुभाष धुळे, रुपेश जाधव, हणमंत दडस, सुप्रीया सापते, पूनम भरगुडे, रेखा तांबे या पोलिस पथकासोबत वाईचा कृष्णा पूल गाठला.
तेथे धाड टाकून प्रत्येक दुचाकीला ५०० रुपये प्रमाणे काही ऑनलाईन तर काही रोख दंड ठोठावला. या कारवाईमुळे काही तासांत अनेक दुचाकीचालकांना हजारो रुपयांचा दंड खिशातून भऱावा लागला.
यासंदर्भात बाळासाहेब भरणे यांनी माहिती दिली, वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वाई शहर ही मोठी बाजारपेठ आहे. तहसीलदार कार्यालय व शेतकऱ्यांशी निगडीत इतर शासकीय कार्यालये आहेत. यासाठी सर्वजण वाईत येतात. वाई शहरात बेशिस्तपणाने नो पार्किंग झोनमध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहने लावल्याने रहदारीला मोठे अडथळे निर्माण होतात.
वाई शहरात आधीच अरुंद रस्ते आहेत. त्याच्या दुतर्फा वाहने लावलेली असतात. त्यामुळे सतत पोलिसांना नागरिकांच्या रोषाला आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून पोलिसांची इच्छा नसतानाही वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी लागते .वाहन चालकांनी कारवाई टाळण्यासाठी आपापली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत असे आवाहन वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे .