सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : काल घरफोडी झाली. त्यामध्ये शेतीच्या कामासाठी ठेवलेले १५ हजार ५०० रुपये व मोटर सायकल चोरट्याने चोरून नेली या चोरीचीच दहशत आणि झालेले नुकसान शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर असतानाच, आज शेतीतील पाईप व वीजपंपाची जवळपास 60 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाली. दोन दिवसाच्या झालेल्या चोरीच्या सत्रामुळे शेतकऱ्याचे डोळे पाणावले.
उत्तम प्रताप फाळके यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. उत्तम फाळके यांच्या इंदापुरातील इंद्रेश्वर नगर (इरिगेशन कॉलनी समोर) येथील घरात काल पहाटे घरफोडी झाली. शेती कामासाठी ठेवलेले पंधरा हजार पाचशे रुपये व त्यांची मोटरसायकल या चोरीत चोरीला गेली होती. तशी तक्रार फाळके यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यासह शेजारील झालेल्या चोरीबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
काल इंदापूर येथे हा जबरी घरफोडीचा प्रकार घडतोय ना घडतोय तोच फाळके यांच्या वरकुटे बुद्रुक येथील गट नंबर 420 या ठिकाणची विंधन विहिरीतील इलेक्ट्रिक सबमर्सिबल तीन एचपी मोटर ज्याची अंदाजे किंमत 32 हजार रुपये, टेक्समो कंपनी केबल 250 फूट अंदाजे किंमत बारा हजार रुपये, दोरी चार हजार पाचशे रुपये व एचडीपी पाईप दोनशे पन्नास फूट अंदाजे किंमत १३ हजार ५०० अशी जवळपास 60,000 पेक्षा जास्त रकमेची चोरी अज्ञात चोरट्याने केली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ओल्या पिकांची काळजी प्रत्येक शेतकऱ्याला असते.अशातच आज झालेली चोरी ही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बाब आहे. शेतीसाठी अष्टोप्रहर राबणाऱ्या शेतकऱ्याला अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे. रक्ताचे पाणी आणि घाम गाळणाऱ्या या शेतकऱ्यांच्या बाबतीत असा प्रकार होत असल्याने, एकीकडे बिन भरवशाचा बाजारभाव आणि हवामानाची प्रतिकूलता याला झगडता झगडता चोरट्यांशीही झगडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.