साखर आयुक्तांनी ठोठावला प्रतिटनी ५०० रुपयांप्रमाणे दंड.. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी व निरा भिमाचाही समावेश! काही तर कारखाने विकले, तरी दंडाची रक्कम भरता यायची नाही अशी स्थिती..!
सुरेश मिसाळ- महान्यूज लाईव्ह
राज्यातील २२ साखर कारखान्यांनी विनापरवाना गाळप केले, म्हणून साखर आयुक्तांनी राज्यातील २२ साखर कारखान्यांना मोठा दणका दिला आहे. विनापरवाना गाळप केल्याबद्दल सुनावण्या घेऊन आता थेट आदेश काढत प्रतिटनी ५०० रुपयांप्रमाणे कोट्यवधींचा दंड कारखान्यांना मारला आहे. विशेष म्हणजे हा दंड १९ एप्रिल रोजी केला आहे, मात्र त्याची आजपर्यंत या कानाची त्या कानाला खबर नव्हती..!
राज्यातील एका नेत्याने राष्ट्रवादीच्या नेत्याला त्रास देण्यासाठी विनापरवाना गाळप केल्याबद्दल या नेत्याच्या कारखान्याविरोधात मोहिम उघडली. यामध्ये साखर आयुक्तालयातील एका अधिकाऱ्यावर कारवाईही झाली. केवळ राजकीय स्वार्थापोटी तक्रार केल्यानंतर त्याची मजा मात्र अंगलट आहे ती २२ कारखान्यांना..! कारण या कारखान्यांना थोडीथोडकी नव्हे १३६ कोटींची रक्कम सरकारला भरावी लागेल.
या कारखान्यांनी विना परवाना गाळप केले, म्हणून त्यांना हा फटका असला तरी प्रत्यक्षात तो ऊस उत्पादकांनाच बसणार आहे, त्यामुळे या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या बाबतीत सरकार काय निर्णय घेते हे पाहावे लागेल. मात्र राजकीय नेते स्वतःच्या राजकारणासाठी राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकत असल्याचेही यातून दिसून आले आहे.
राज्यातील पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना भोर, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूर, निरा-भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील सिध्दनाथ शुगर मिल्स तिऱ्हे, ओंकार साखर कारखाना चांदापुरी, माळशिरस, मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी, टोकाई साखर कारखाना कुरुंदा हिंगोली, श्री तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना वारणानगर, मातोश्री लक्ष्मी कोजनरेशन इंडस्ट्रीज रुद्देवाडी, ता. अक्कलकोट- सोलापूर, शंकर सहकारी साखर काऱखाना सदाशिवनगर, माळशिरस, जयभवानी सहकारी साखर कारखाना गेवराई-बीड.
भिमा सहकारी साखर कारखाना टाकळीसिकंदर, मोहोळ, डीडीएनएसएफअे हावरगाव, कळंब, कंचेश्वर शुगर लि. मंगळूर, तुळजापूर, बळीराजा साखर कारखाना कानडखेड परभणी. संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी घोडसगाव, ता. मुक्ताईनगर, श्रध्दा एनर्जी अॅण्ड इन्फ्रा प्रोजेक्ट वरफळ, ता. परतूर. जाकरया शुगर, मोहोळ, रामेश्वर सहकारी साखर कारखाना सिपोराबाजार, जालना. घृष्णेश्वर शुगर, खुलताबाद, औरंगाबाद. समृध्दी शुगर्स रेणूकानगर, घनसावंगी -जालना आदी कारखान्या्ंचा यामध्ये समावेश आहे.
या २२ साखर कारखान्यांना तब्बल १३६ कोटी ३२ लाख ६ हजार ५५० रुपयांचा दंड साखर आयुक्तांनी ठोठावला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा दंड ठोठावला गेल्याने खळबळ उडणारच आहे. मात्र अशा प्रकारचा दंड का ठोठवावा लागला, त्याचीही चर्चा होणार आहे.
राज्यात या २२ साखर कारखान्यांना विविध मुद्द्यांवर साखर आयुक्तालयाने नोटीसा पाठवल्या होत्या. त्याची सुनावणीही घेण्यात आली, विनापरवाना गाळप केले, मुख्यमंत्री सहायता निधी, लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळ, थकीत एफआरपी अशा विविध मुद्द्यांचाही यामध्ये विचार करण्यात आल्याचे दिसते.
दंड कारखान्याला, मात्र सोसावा लागणार शेतकऱ्यांना..!
हा दंड थोडाथोडका नव्हे तर १३६ कोटींचा आहे आणि याचा परिणाम फक्त कारखान्यावर नाही, तर टनामागे ५०० रुपयांमुळे तो शेतकऱ्यांवरच भारी पडणार आहे. हा कसला साखर आयुक्तालयाचा निर्णय? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटल्या आहेत. कारण शेवटी या दंडाचा परिणाम हा साखर कारखान्यालाच नव्हे, तर शेतकऱ्यालाच भोगावा लागणार आहे.
कोणाला किती दंड?
पुणे जिल्हा – कर्मयोगी शंकरराव पाटील- १९ कोटी ६४ लाख ४५ हजार ५००, नीरा भिमा ३ कोटी १६ लाख, राजगड- २ कोटी ६२ लाख ७५ हजार ५००
सोलापूर जिल्हा – आष्टी शुगर सोलापूर – १ कोटी १२ लाख ६७ हजार, सिद्धनाथ शुगर- ६ कोटी ५१ लाख ८७ हजार, ओंकार शुगर- ४१ लाख १४ हजार ५००, मकाई- ७ कोटी ९६ लाख ६७ हजार ५००, मातोश्री लक्ष्मी शुगर- १ कोटी १६ लाख ५२ हजार ५००, श्री शंकर सहकारी- १ कोटी ६१ लाख ४६ हजार ५००, भीमा सहकारी- १३ कोटी ३ लाख ५५ हजार, जकराया शुगर- १० कोटी ५७ लाख २० हजार.
डीडीएनएसएफए १ कोटी २७ लाख, कंचेश्वर ३ कोटी ६४ लाख ३० हजार. जालना जिल्हा – श्रद्धा एनर्जी १५ कोटी ९७ लाख ९५ हजार ५००, रामेश्वर- ५ कोटी ५२ लाख ५० हजार, समृद्धी शुगर्स १४ कोटी ६४ लाख १८ हजार ,
हिंगोली जिल्हा – टोकाई- ५ कोटी ४५ लाख २५ हजार, कोल्हापूर जिल्हा – तात्यासाहेब कोरे, वारणा- ९ कोटी ६१ लाख ४५ हजार, बीड जिल्हा – जयभवानी, गेवराई – २ कोटी ४४ लाख ३० हजार,
परभणी जिल्हा – बळिराजा-२५ कोटी ४ लाख ३५ हजार, जळगाव जिल्हा – संत मुक्ताई- १५ कोटी ३ लाख ८५ हजार, छत्रपती संभाजीनगर – घृष्णेश्वर १० कोटी ४ लाख ५३ हजार