सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर शहरातील इरिगेशन कॉलनी समोरील इंद्रेश्वरनगर भागात काल रविवारी (दि.७) पहाटे अज्ञात चोरांनी दोन ठिकाणी घरफोडी करत दुचाकी वाहनासह,दागीने व रोख रकमेसह सव्वा लाखांची चोरी केली.
चोरीच्या ठिकाणाच्या जवळच काही फुटांवर पोलीस कर्मचारी व एक अधिकारी राहत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र चोरी करणारे सराईत किंवा भुरटे चोर जरी असले तरी मात्र चोरांनी आपली त्या भागात हातचलाखी दाखवली आहे.
यासंदर्भात उत्तम प्रताप फाळके यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी माहिती अशी की, उत्तम फाळके घरात झोपले असता त्यांच्या पत्नीस पहाटे पावणे पाच वाजता घरात कसलातरी आवाज आला. त्या उठल्यावर मात्र चोरांनी पोबारा केला. मात्र यात सोमवारी शेतीच्या कामासाठी ठेवलेले १५,५०० रुपये चोरीला गेले. चोरांनी दारात उभी केलेली ४५ हजारांची त्यांची होन्डा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्रमांक.एम एच ४२ एडी ६०५२) ही चोरून नेली. शेजारी जवळच राहणारे श्रीमती अनुराधा संतोष शेळके यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून घरातील ५ हजारांची रोकड व ५८ हजारांचे दागिने त्यात सोन्याच्या दोन चेन, कानातील टॉप असा एकूण १ लाख २३ हजार ५०० रुपयांची घरफोडी करुन चोरी झाली आहे.
याचवेळी वाघचौरे यांच्या इमारतीतील एका भाडेकरुचे एक हजार रुपये ही चोरट्यांनी चोरले. तसेच या भागात असणाऱ्या २/३ मोटरसायकल मधील पेट्रोल ही चोरांनी चोरून नेले. विशेष म्हणजे या भागात रात्री कोणी अनोळखी आल्यास कुत्र्यांचा आवाज होतो. मात्र तसे घडलेले दिसले नाही.तर दररोज येणारा गुरखा त्यादिवशी गावाला गेला होता. चोरी घडलेल्या घराच्या नजीक एक पोलीस कर्मचारी व तसेच एक सहायक पोलिस अधिकारी राहत असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.
पहाटे चोरी मात्र सकाळी खूप उशिरापर्यंत त्यांनाही चोरीची भणक लागली नाही, माणुसकीच्या नात्याने चौकशी करून आधार देण्याची गरज होती, असे नागरिकांनी सांगितले. मात्र पोलीस अधिकारी लंगोटे साहेब व पोलीस नाईक सलमान खान यांनी योग्य प्रकारे तपासाला सुरुवात केल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान चोरी झाल्यावर पहाटेच लगेच तेथील नागरिकांनी इंदापूर पोलीस ठाण्याच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो उचलला गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी इंदापूर पोलीस ठाण्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर असताना दररोज रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग होत असे तसेच रात्री गुन्हा घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणा कामाला लागत होती, अशी प्रतिक्रिया तेथील राजू वाघचौरे, उत्तम फाळके तसेच इतर रहिवाशांनी दिली. वास्तविक पाहता यापूर्वीही काही घटनांमध्ये पोलीस ठाण्याशी संपर्क केल्यास फोन उचलला जात नाही. चौकशी केल्यावर तो खराब झाला आहे असे सांगण्यात येते. पेट्रोलिंग पुन्हा चालू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.