मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय त्यांनी नेमलेल्या समितीलाही मान्य नसल्याचे दिसते. थोड्या वेळात मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात समितीची बैठक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेच अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव मांडणार आहेत अशी खात्रीलायक माहिती आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आत्ताच पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर माहिती दिली. कार्यकर्ते ऐकायला तयार नसल्याने व अध्यक्षपदी शरद पवारच हवेत अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याने, आम्ही स्वतःही हा प्रस्ताव मांडणार आहोत असे भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान शरद पवार जोपर्यंत हा निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती मेहबूब शेख यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. राष्ट्रवादीचे मोठे मोठे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव बैठकीत येणार असल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
अर्थात शरद पवार हे अध्यक्षपदी आणि कार्याध्यक्षपदी इतर नावे येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात समितीमध्ये चर्चा होणार असल्याची समजते. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा कार्याध्यक्ष कोण यावर नव्याने चर्चा होईल असे दिसते.