दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रत्नदीप भंडारे, ठाणे अंमलदार गंगावणे, बापुराव धायगुडे, हवालदार आनंदा भोसले, जितेंद्र इंगुळकर, सुशांत धुमाळ, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते यांच्या पथकाने रात्रगस्त घालताना हैराण करणारा चोरटा ताब्यात घेतला.
वाई तालुक्यातील उतारे गावच्या हद्दीत रात्रगस्त घालत असताना भुईंज पोलिस दप्तरी गुन्ह्याची नोंद असणारा योगेश संदीप बाबर (रा. उडतरे ता.वाई) हा गुन्हेगार उडतरे गावच्या परिसरात संशयास्पद फिरत असताना पोलिस पथकाला दिसून आला. मात्र पोलिसांना पाहताच तो पळत सुटला, मग पोलिस पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून अखेर योगेश याला ताब्यात घेतले.
त्याला एवढ्या रात्रीचा का फिरतो अशी विचार पुस केली असता पोलिसांना अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने पोलिसांना पोलिसी खाक्या वापरावा लागला. त्यामध्ये त्याने सातारा शहरातील चोरलेल्या दुचाकीची कबुली दिली. तसेच भुईंज पोलिस ठाण्यातही दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत दिलेल्या विविध सूचनांच्या संदर्भात तपास करत असताना दुचाकी चोरून लोकांना हैराण करणारा चोरट ताब्यात आल्याने शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भुईंज पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.