दौंड तालुक्यातील हा पहिलाच गुन्हा!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील लोकशाही न्यूज चॅनलचे पत्रकार विनोद गायकवाड यांच्यावर दोन दिवसापूर्वी लग्न विवाह समारंभाच्या कार्यक्रमात पाच -सहा जणांनी बातम्या दिल्याचा राग धरून हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. दरम्यान, पत्रकारावर हल्ला करणे, शिवीगाळ करणे मारहाण करणे या गंभीर गुन्ह्यांसाठी अजामीन पत्र गुन्हा आहे, पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हा दौंड तालुक्यातील पहिलाच गुन्हा आहे.
साहिल रामदास गायकवाड, शुभम भानोबा गायकवाड, सत्यम भानोबा गायकवाड, स्वप्निल रामदास गायकवाड, गणेश लिंबाजी गायकवाड (सर्व राहणार कुसेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील लोकशाही न्यूज चॅनलचे पत्रकार विनोद मनोहर गायकवाड हे ३० एप्रिल रोजी पाटस येथील पंचरत्न मंगल कार्यालयामध्ये कुसेगाव येथील सतीश मधुकर गायकवाड यांच्या मुलीचे लग्न असल्याने ते या लग्न समारंभासाठी गेले होते. विनोद गायकवाड हे लग्न मंडपातून जेवायला जात होते.
तेव्हा साहिल रामदास गायकवाड, शुभम भानोबा गायकवाड, सत्यम भानोबा गायकवाड, स्वप्निल रामदास गायकवाड, गणेश लिंबाजी गायकवाड यांनी दोन वर्षापुर्वी कुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या वादाची बातमी केल्याचा राग मनामध्ये धरून शिवीगाळ करत आज तुला सोडतच नाही, तु दोन वर्षापासून खोटया नाटया बातम्या देतोस, आज तुझी पत्रकारीताच काढतो असे म्हणुन हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच शुभम गायकवाड याने हातातील कसल्यातरी धारधार हत्याराने डोक्यात मारहाण केली.
या आरोपींनी गायकवाड यांच्यावर जिवघेना हल्ला केला. या हल्ल्यात विनोद गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यातून विनोद गायकवाड हे बचावले असले तरी अतिशय गंभीर घटना आहे. या घटनेची गंभीर दखल घेत दौंडसह राज्यभरातील विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आणि आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकताच या प्रकरणी पाच जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











