सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात वार्षिक गुणगौरव पुरस्कार समारंभामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व सहकाऱ्यांनी पुरस्कार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह स्वीकारले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंकिताताई पाटील – ठाकरे, मुख्याधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.सुश्रुत शहा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत इंदापूर तालुक्यात एकूण दहा केंद्र असून त्यातून हा पुरस्कार आम्हाला मिळाला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून सन २०१३ साली बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली असून केंद्र अंतर्गत एकूण ३२४८६ इतकी लोकसंख्या आहे. ५१ कर्मचाऱ्यांसह आम्ही काम करतो.
सन २०२२-२३ मध्ये कुटुंब पाहणी सर्वेक्षण अंतर्गत ८ हजार कुटुंबांचा सार्वजनिक आरोग्य सर्व्हे करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे उत्तम आरोग्य नियोजन करण्यात आले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजने अंतर्गत १८ ते ४९ वयोगटातील २२०० महिला तर जागरूक पालक सुदृढ बालक योजनेअंतर्गत ० ते १८ वर्षाचे ९८०० मुलांची शाळा / अंगणवाडी मध्ये जावून प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
केंद्रात ३२ सुलभ प्रसूती झाल्या तर १७३ महिलांची मोफत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. २०० महिलांना पंतप्रधान मातृत्व वंदन योजना आणि जननी सुरक्षा योजनेमध्ये ५ हजार आणि ७०० रुपयांचा लाभ देण्यात आला. ५२ वयोवृध्द व्यक्तींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली असून सुंदर माझा दवाखाना अभियान राबविले जात आहे.
राज्याचे माजी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, यांची जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, युवा नेते महेंद्र रेडके, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आदींनी डॉ.सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.