दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई ते पसरणी रस्त्यावरील पाण्याचा ओढा येथे भरघाव वेगातील ट्रॅक्टरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अक्षय आनंदराव महांगडे (वय २७) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त ट्रॅक्टर हा न थांबवता ट्रॅक्टर चालकाने पलायन केले अशी माहिती वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजली, तेव्हा त्यांनी अपघातस्थळावर हवालदार श्रीनिवास बिराजदार, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर यांना ट्रॅक्टर शोधून काढण्याचे आदेश दिले.
ट्रॅक्टर शोधून काढण्यासाठी पोलीस पथकाने अनेक ठिकाणचे सीसीटिव्ही चेक केले. एका ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात ट्रॅक्टर दिसून आल्याने हे पथक थेट ट्रॅक्टरमालकाच्या दारात पोहचले आणि चालक संतोष बल्लाळ याच्यासह ट्रॅक्टर ताब्यात घेतला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर आणि चालकाला अवघ्या ३० मिनिटांतच शोधुन काढल्याने पसरणी ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले.
दुसरीकडे अक्षय मांढरे यांचे अपघाती निधन झाल्याने पसरणी गावावर शोककळा पसरली आहे. अक्षय आनंदराव महांगडे हा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून पसरणी गावाकडे निघाला होता. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची तक्रार चंद्रकांत तात्याबा महांगडे यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली. त्याचा अधिक तपास हवालदार श्रीनिवास बिराजदार हे करीत आहेत.