पंजाबच्या लुधियाना शहरातील गॅसपुरा या भागात एका दुकानातून झालेल्या गळतीमुळे आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला असून, पंधराहून अधिक जण बेशुद्ध झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला, सहा पुरुषांचा समावेश असून यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.
या घटनेने पंजाबात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे, दरम्यान काही दिवसांपूर्वीच बारामती तालुक्यातील खांडज मध्ये देखील अशाच प्रकारे विषारी गॅस गळतीने एकाच कुटुंबातील तिघेजण तर एकूण चौघेजण मृत्यूमुखी पडले होते. त्याची आठवण यानिमित्ताने बारामतीकरांना देखील झाली.
येथील गोयल नावाच्या किराणा दुकानामधून गॅस गळती झाली असे सांगितले जाते. ही गॅस गळती झाल्यानंतर दुकानातील मालक जागीच बेशुद्ध झाला, तर या दुकानाच्या वर राहणारे कुटुंब देखील बेशुद्ध पडले आणि त्यानंतर जो बेशुद्ध होणाऱ्या माणसाला वाचवायला जात होता, तो प्रत्येक जण बेशुद्ध होऊन पडत होता.
पाहता पाहता गॅस गळतीमुळे तबला 11 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान प्रशासनाने तातडीने या ठिकाणचा परिसर सील केला असून, किराणा दुकानातील चार डीप फ्रिजर मधील गॅसची एकाच वेळी गळती झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शेजारच्या गटारातून देखील गॅस गळती झाली असे प्रत्यक्षदर्शी लोक सांगत आहेत.
दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त करत लुधियानाच्या गॅसपुरा भागातील कारखान्यातून गॅस गळती झाल्याचे नमूद केले आहे.